मुरुड : प्रतिनिधी
भारतीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्य बाण चिन्ह व शिवसेना नावाची मान्यता मिळताच शनिवारी मुरुड शहरातील बाजारपेठेत मोठ्या संख्येने शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र येऊन फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. तसेच सर्वाना पेढे भरून तोंड गोड करण्यात आले. आज कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला विजयाच्या मोठ्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या.
गेले कित्येक महिने हा वाद निवडणूक आयोगाकडे सुरु होता. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अलिबाग – मुरुड विधानसभा क्षेत्रात मोठे बदल घडून येणार असे दिसून येत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच घेतलेले धाडसी निर्णय व त्यांच्या सोबत असणार्या आमदारांना त्यांच्या मतदार संघात विकास कामासाठी दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी हे वैशिष्ट्य ठरले असून अगोदरपासूनच शिंदे गटात प्रवेश करणार्यांचा राबता सुरु होता. परंतु निवडणूक आयोगाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे आणखीन मोठा फायदा शिंदे गटाला होणार असून अधिकृत मान्यता मिळाल्यामुळे प्रवेश करणार्यांची संख्या सुद्धा आता वृद्धीगंत होणार आहे, असा विश्वास येथील असंख्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अलिबाग, मुरुड व चणेरा जिल्हा परिषद मतदार संघामधून विधानसभा क्षेत्र तयार करण्यात आलेला आहे. सुमारे दोन लाख 20 हजार मतदार संख्या असलेला हा मतदार संघ आहे. या मतदार संघात युवा मतदार संघ अधिक आहे. स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी सुरुवातीपासूनच शिंदे गटाला समर्थन केल्याने सर्वाधिक कोट्यवधींचा निधी ते आपल्या मतदार संघात आणून जास्तीत जास्त विकास कामे त्यांनी पूर्णत्वास नेली आहेत. त्यांना या मतदार संघात जनसमर्थन सुद्धा मिळत आहे. नुकताच निवडणूक आयोगाचा निर्णय लागल्याने आता काटावर बसलेले व मोठा जास्त जनसमुदाय शिंदे गटात प्रवेश करणार्यांची संख्या वाढणार असे संकेत मिळत आहे. आज मुरुड शहरात फटाक्याची आतषबाजी करून मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, माजी नगरसेविका युगा ठाकूर, मेघाली पाटील, गिरीश साळी, संदीप पाटील, समीर दौनाक, महेश पाटील, महेंद्र भाटकर, बाबू सुर्वे, किशोर माळी, तुषार कारभारी, राकेश मसाल,ि नतीन आंबुर्ले, वीरेंद्र भगत, योगेश ठाकूर, अनंता शेडगे आदीसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
यावेळी शिंदे गटाच्या रायगड जिल्हा संघटिका शुभांगी करडे यांनी सांगितले, निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे रायगड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. हा विजय सत्याचा असून मुख्यमंत्री शिंदे साहेब शिवसेनेचे विचार दूरवर पोहचवतील शिवसेना बळकट करतील. लोकांचा भ्रम दूर झाला असून खरी शिवसेना शिंदे साहेबाचीच आहे. त्यामुळे आता पक्ष प्रवेश करणार्यांची संख्या वाढणार आहे. अलिबाग मुरूडच्या विकासासाठी आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा विकास निधी उपलब्ध करून दिल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरु असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर यांनी सांगितले , बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन शिंदेसाहेब पुढे आले त्यांनी पक्षातील आमदारांना भरघोस निधी प्रदान करून विकासाची दालने खुली केली आहेत. निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य असून त्याचे आम्ही समर्थन करीत असल्याचे यावेळी सांगितले.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …