पहिला डाव 150 धावांवर संपुष्टात; भारत 1 बाद 86
इंदूर : वृत्तसंस्था
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र पहिल्या डावात हा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याचे दिसून आले. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्यापुढे बांगलादेशचा पहिला डाव केवळ 150 धावांत आटोपला. दरम्यान, भारताने पहिल्या दिवसअखेर भारताने 1 बाद 86 धावा केल्या आहेत.
शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. दुसर्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला, पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. मोमिनुलने आठ चौकारांसह 80 चेंडूंत 37 धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 105 चेंडूंत 43 धावा केल्या. बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आले नाही. लिटन दासने 21 धावा करीत झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही बांगलादेशचा डाव 150 धावांत आटोपला. भारताकडून मोहम्मद शमीने तीन, तर अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.
यानंतर भारताने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केली. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला, परंतु चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल यांनी दमदार खेळी केली. या दोघांनी 72 धावांची नाबाद भागीदारी केली. सध्या अग्रवाल 37, तर पुजारा 43 धावांवर खेळत आहे.