आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन;
सत्ताधार्यांचे सर्व पक्षांना आवाहन
मुंबई ः प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार (दि. 27)पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 26) एकत्र पत्रकार परिषद घेतली. या अधिवेशनात लोकायुक्ताचे विधेयक पास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून सर्व पक्षांनी या कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन सत्ताधार्यांमार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले. अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेतले जातील. विरोधकांनी विधिमंडळात लोकहिताचे मुद्दे मांडावेत. त्यांच्या प्रश्नावर उत्तरे द्यायला आम्ही तयार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबरोबरच विरोधी नेत्यांना धमकी देण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. त्याची चौकशी करण्यात येईल, पण संजय राऊत हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशी काही तरी वक्तव्य करीत असतात, असा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधकांनी सकारात्मक मुद्दे मांडावेत. त्यावर चर्चा केली जाईल. या अधिवेशनातून आम्ही जनतेच्या प्रश्नांवर भर देऊ. रखडलेल्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. मुंबईतील प्रकल्पांचे काम वेगात सुरू आहेत. या अधिवेशनात धोरणात्मक निर्णय होतील. विरोधकांनी आज चहापानावर बहिष्कार घातला. त्यांच्यासोबत चहापान टळले हे बरेच झाले. सत्ता गेल्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आम्ही समजू शकतो, पण लोकशाहीत बहुमताला महत्त्व असून आमचे सरकार हे बहुमताचे सरकार आहे.