पनवेल : प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2023 पनवेल शहरात राबविले जात असताना ‘प्रोग्रेसिव्ह पनवेल’ हा ब्रॅन्ड जनतेपर्यंत पोहचविण्याठी महानगरपालिका आणि आयटीम इस्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 28) स्वच्छथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सिंगल युज प्लास्टिकवरील निर्बंधांविषयी जनजागृती करण्यासाठी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थी हे समाजाचे भविष्य् असतात त्यांच्या माध्यमातून ‘हरा गिला सुखा निला’ हा संदेश नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी स्वच्छथॉन रॅलीचे आयोजन केले होते. पनवेल महानगरपालिका आणि आयटीम इस्टिट्युट ऑफ हेल्थ सायन्स महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छथॉन रॅली काढण्यात आली. या वेळी उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. वैभव विधाते, आयटीएम महाविद्यालयाचे संचालक डॉ. संकल्प राव, रजिस्टार डॉ. किरण राणे, विभाग प्रमुख अनिल कोकरे, शैलेश गायकवाड, इन्फिनीटी फाउंडेशनचे आयुफ आकुला, सर्व निरिक्षक उपस्थित होते. उपायुक्त सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या कचरा पासबूक संकलन योजनेबद्दल माहिती दिली, तसेच 3आर- रियुज, रिसायकल, रिप्रोड्यूस ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
सकाळी नवीन पनवेल येथील आयटीएम महाविद्यालयातून या स्वच्छथॉन रॅलीस सुरुवात झाली. आय्यपा मंदिर, रामकृष्ण मिशन कॉर्नर, सीकेटी कॉलेज, बिकानेर स्टेशन, एचडीएफसी सर्कल, डि मार्ट, फोनिक्स हॉटेल, आदई सर्कलवरून शेवटी पुन्हा आयटीएम महाविद्यालयात ही रॅली आली. आयटीम महाविद्यालयाचे शंभरहून अधिक विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये स्वच्छता संदेश लिहलेले बॅनर देण्यात आले होते. महाविद्यालयात खास सेल्फी पाँईट तयार करण्यात आला होता.
पनवेल महापालिका प्रोग्रेसिव्ह पनवेल बनण्यावर भर देत आहे. यासाठी तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत स्चच्छतेचा संदेश पोहचविला पाहिजे. तरूण पिढीने यासाठी पुढाकार घ्यायला हवा. विविध महाविद्यालयाच्या माध्यमातून महानगरपालिका स्वच्छतेचा संदेश जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करते आहे.
-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका