Breaking News

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला सिडकोकडून 40 लाखांचे अर्थसहाय्य

नवी मुंबई : : प्रतिनिधी

सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष (मॉड्युलर ऑपरेशन थिएटर) विकसित करण्याकरिता 40 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयास मंजुरी देण्यात आली.

याविषयी बोलताना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोतर्फे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयास करण्यात येणारे आर्थिक सहाय्य हे तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे आधुनिक साधनसामुग्रीसह सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष सुरू होऊन नागरिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा माफक दरात उपलब्ध होणार आहेत, असे मत व्यक्त केले. 

राज्य शासनातर्फे पनवेल येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढवून त्याचे रूपांतर 120 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे. या नवीन रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटनही झाले. या रुग्णालयातील 120पैकी 20 खाटा या ट्रॉमा केअरसाठी, 10 खाटा अतिदक्षता विभागाकरिता, डायलिसिसकरिता 10 खाटा, प्रसूतीकरिता 20 खाटा आणि उर्वरित खाटा स्त्री व पुरुषांच्या जनरल वॉर्डकरिता राखीव आहेत. सध्या या रुग्णालयामध्ये एक्स-रे, सोनोग्राफी, सीटी स्कॅन या सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयामध्ये नेत्ररोगचिकित्सा व अस्थिव्यंग चिकित्सा याकरिता प्रत्येकी 1 याप्रमाणे 2 सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष, प्रसूती व स्त्रीरोग याकरिता प्रत्येकी 1 आणि कान-नाक-घसा शस्त्रक्रियेसह सर्वसाधारण शस्त्रक्रियेसाठी 2 असे एकूण 6 शस्त्रक्रिया कक्ष प्रस्तावित आहेत. अस्थिव्यंग शस्त्रक्रिया कक्षामध्ये ऑपरेशन लाइट, टेबल, अ‍ॅनेस्थेशिया स्टेशनसह पॉवर ड्रील, न्यूमॅटिक टॉर्निकेट व सी-आर्म मशिनही प्रस्तावित आहे.

पनवेल तालुक्याची लोकसंख्या 16 लाखांहून अधिक असून, तालुक्यात सिडकोने विकसित केलेल्या नोड्चा समावेश आहे. या भागात कोणतेही शासकीय, महापालिकेचे किंवा सार्वजनिक रुग्णालय नाही. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे महामार्ग व जेएनपीटीकडे जाणारा मार्ग या मार्गांवरील पनवेल हे महत्त्वाचे ठिकाण आहे. तळोजा व रसायनी औद्योगिक क्षेत्रही पनवेलपासून नजीकच्या अंतरावर आहे. हे उपजिल्हा रुग्णालय  या परिसरातील मध्यवर्ती व ट्रॉमा केअर आणि अन्य वैद्यकीय सेवा देणारे एकमेव शासकीय रुग्णालय आहे. पनवेल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी 3 जुलै 2019च्या पत्रान्वये सिडकोकडे रुग्णालयातील दोन सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष, 1 पॉवर ड्रील, 1 न्यूमॅटिक टॉर्निकेट आणि 1 सी आर्म मशिन याकरिता सिडकोच्या सीएसआर निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

सिडकोतर्फे यापूर्वीच या परिसरात पायाभूत सुविधा विकसित करण्यासह विविध कक्षनिर्माण योजनांतर्गत घरांचे बांधकामही करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या प्रशासनाकडून परिसरातील हे एकमेव रुग्णालय असल्याने तेथे सुसज्ज शस्त्रक्रिया कक्ष विकसित करण्यासह अन्य साधनसामुग्रीकरिता अर्थसहाय्य देण्याची विनंती लक्षात घेऊन सिडकोतर्फे या रुग्णालयास 40 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सिडकोच्या आरोग्य विभागाच्या अंदाजपत्रकामध्ये रकमेचे समायोजन करण्यात येईल.

नवी मुंबईतील सामाजिक हिताच्या उपक्रमांना सहाय्य करण्याची भूमिका सिडकोतर्फे नेहमी घेण्यात येते. या भूमिकेचाच एक भाग म्हणून शासकीय रुग्णालयाला अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे हे रुग्णालय अद्यावत होऊन परिसरातील गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना अल्पदरात दर्जेदार वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply