नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आज आपल्याला अनेक वस्तूंची परदेशातून आयात करावी लागते. आपल्याला त्या वस्तू भारतात कशा तयार होतील याचा विचार करावा लागणार आहे. तसेच त्या आपण कशा निर्यात करू शकू हेदेखील पाहावे लागेल. लोकलसाठी व्होकल होण्याची हीच योग्य वेळ आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोठ्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे आणि आता त्या प्रत्यक्षात साकारण्यात येत आहेत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केले. कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान त्यांनी गुरुवारी (दि. 11) इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (आयसीसी) विशेष कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. त्या वेळी ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच बंगाली भाषेतून केली. गेली 95 वर्षे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून देशसेवा केली जात आहे. आज देशाला आत्मनिर्भर होणे आवश्यक आहे. तसेच दुसर्या देशांवर अवलंबून राहणे आता कमी करावे लागणार आहे, असे मोदी या वेळी म्हणाले. स्थानिक उत्पादनांसाठी क्लस्टरच्या आधारावर बळकटी देण्यात येत आहे. ईशान्येकडील राज्यांना सेंद्रिय शेतीचे हब बनवण्यावर विचार सुरू आहे. आयसीसीने ठरवल्यास याची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करता येऊ शकते. कोलकात्याने पुन्हा एकदा लीडर बनण्याची वेळ आली आहे. बंगाल जो आज विचार करतो तो संपूर्ण देश पुढे करतो असे म्हटले जाते, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी नमूद केले.
पाच वर्षांनंतर संस्था 100 वर्षे पूर्ण करेल. 2022मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होतील. अशातच आत्मनिर्भर भारत अभियान पूर्ण करण्यासाठी संकल्प करण्याची हीच योग्य वेळ आहे. कोरोनाचे संकट संधीत बदलण्याचा संकल्प देशवासीयांच्या मनात आहे. या संकटाला आपल्याला टर्निंग पॉइंट सिद्ध करायचे असल्याचेही पंतप्रधानांनी या वेळी नमूद केले.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …