पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील उन्हेरे बुद्रुक (धनगरवाडी) येथील राम धोंडू ढेबे यांच्या घराला अचानक आग लागली. या आगीत दोन लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल व रोख रक्कम जळून खाक झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ही आग नक्की कशाने लागली याचे कारण समजलेले नाही. मात्र आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे. गावकर्यांनी मिळून ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या आगीत 50 किलो गहू, कपडे, एक क्विंटल तांदूळ, एक कुलर, चार प्लास्टिक बॅरल, इतर खाण्याचे पदार्थ, मुलांचे शैक्षणिक साहित्य असे मिळून तब्बल एक लाख 78 हजारांचा मुद्देमाल व 23 हजार रुपये रोख रक्कम जळून खाक झाली आहे. त्यामुळे राम ढेबे यांचे तब्बल दोन लाख एक हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठ्यांनी लागलीच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. यावेळी पोलीस पाटील शिवमूर्ती पवार व गावकरी उपस्थित होते.