Breaking News

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; कर्जत विधानसभा मतदारसंघात 2 लाख 79 हजार 790 मतदार

कर्जत : प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघामधील  कर्जत विधासभा मतदारसंघात 2 लाख 79 हजार 790 मतदार असून, त्यातील सुमारे 45 हजार 840 नवमतदारांची नोंदणी मागील पाच वर्षात झाली आहे. सोमवारी (दि. 29) होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी दिली.

मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. कर्जत विधानसभा मतदारसंघात कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात पूर्वी म्हणजे 2014 मध्ये 2 लाख 33 हजार 950 मतदार होते. त्यात वाढ होऊन या वर्षी मतदारांची संख्या 2 लाख 79 हजार 790 झाली आहे. म्हणजेच 45 हजार 840 मतदारांची वाढ झाली आहे.

कर्जत विधानसभा मतदारसंघात 343 मतदान केंद्र आहेत. त्यामध्ये 326 मुख्य केंद्र आहेत. काही केंद्रात ग्रामीण भागात बाराशेच्यावर, तर शहरी भागात चौदाशेच्यावर मतदार झाल्याने 17 केंद्र ही सहाय्यकारी मतदान केंद्र बनविण्यात आली आहेत. तुंगी, पेठ, कळकराई आणि ढाक ही चार मतदान केंद्र अतिदुर्गम भागातील मतदान केंद्र आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात साधारण 70 टक्के मतदार नोंदणी झाली आहे. मतदान करण्यासाठी लागणार्‍या मतदान ओळखपत्राचे वाटप जलदगतीने सुरू आहे. जवळपास 95 टक्के ओळखपत्र वाटप झाली आहेत. मतदान केंद्रावर मोबाईल वापरास बंदी आहे त्यामुळे मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नये, असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी केले आहे.

मतदान स्लिपबरोबर निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रॉयव्हिंग लायसन्स आदी असे एकूण 11 यापैकी एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जावे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी केले आहे.

स्त्री मतदार – 1 लाख 37 हजार 462

पुरुष मतदार – 1 लाख 42 हजार 328

दिव्यांग मतदारांची संख्या- 943

मतदान केंद्र – 343

झोनल अधिकारी – 44

बुथ लेवल ऑफिसर- 343

पोलिंग ऑफिसर – 1885

पोलीस कर्मचारी – 343

-कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेमध्ये कर्मचारी व मतदान मशीन ये-जा करण्यासाठी 44 एसटी बसेस, 5 मिनी बस, 64 जीप, 3 ट्रक, 1 इतर अशी 117 गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.   यादवराव तासगावकर अभियांत्रिकी महाविद्यालयात मतपेटी सुरक्षा कक्ष (स्ट्रॉग रूम) बनविण्यात आला आहे.

-वैशाली परदेशी-ठाकूर, निवडणूक निर्णय अधिकारी, कर्जत

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply