शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष
म्हसळा : प्रतिनिधी
पुणे-माणगाव-दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्गाच्या म्हसळ्यापासून माणगावपर्यंतच्या टप्प्यालगत केबलसाठी खड्डे खणण्याचे काम सुरू असून, त्यामुळे पावसाळ्यांत या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढण्याचा शक्यता आहे. केबलसाठी खड्डे खणणार्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी छावा मराठा योध्दा संघटनेचे रिजवान मुकादम यांनी केली आहे. पुणे-माणगाव-दिघी बंदर या राष्ट्रीय महामार्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या महामार्गावरील घोणसे घाटात अपघाताची मालिका सुरू आहे. अनेक ठिकाणी मोर्यांवर गाड्या आपटत आहेत. आता या महामार्गालगत साईडपट्टीजवळच केबलसाठी खोल खड्डे खणले जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.या कामाला एमएसआरडीसीची मान्यता नाही ते काम निकषानुसारसुध्दा होत नाही, तसेच साईडपट्टीजवळ केबलसाठी खड्डे खणल्यानंतर ते योग्य तर्हेने भरले जात नसल्याने पावसाळ्यांत या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे खड्डे खोटणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी छावा मराठा योध्दा संघटनेचे रिजवान मुकादम यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे. पुणे-माणगाव-दिघी बंदर हा रस्ता खर्या अर्थाने जळगाव-औरंगाबाद-पुणे-माणगाव-दिघी बंदर महामार्ग असा आहे. तो सुरत-कटक आणि मुंबई-बंगलोर या महामार्गांना छेद देणारा आहे. त्यामुळे माणगाव-दिघी बंदर या महामार्गावर भविष्यांत अवजड आणि पर्यटकांच्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दर्जासाठी एमएसआरडीसीच्या इंजिनिअर आणि स्थानिक नागरिकांनी सर्तक रहाणे गरजेचे आहे.
माणगाव ते दिघी बंदर हा रस्ता दोन लेन, दोनही बाजूस साईडपट्टी आणि बांधकाम स्वरुपाचा आहे. नुकताच बनविलेला हा रस्ता खोदल्यास पावसाळ्यात धोका निर्माण होण्याचा संभव आहे. या रस्त्यालगत केबलसाठी खोदकाम करणार्यांविरोधात माणगाव आणि म्हसळा पोलीस ठाण्यांत लेखी तक्रार दिली आहे.
-सचिन निफाडे, कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ