Breaking News

हिंदुत्वाचा गजर

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील शासकीय यंत्रणेतील त्यापूर्वीची ढिलाई मागे पडली असून खर्‍या अर्थाने जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे गतिमान सरकार कार्यरत असल्याचे स्पष्टपणे जाणवू लागले आहे. त्यामुळे फडणवीस-शिंदे सरकारच्या विरोधात अवघे बळ एकवटून, एकजुटीने उभे राहण्यासाठी धडपडणार्‍या महाविकास आघाडीसमोर हिंदुत्वाचा आधार घेण्याशिवाय पर्यायच उरलेला नाही हे त्यांच्या रविवारच्या वज्रमूठ सभेतून पुरते स्पष्ट झाले. राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना यांची आघाडी व सत्ता हातातून निसटल्यामुळे अद्यापही छटपटणारी महाविकास आघाडी आगामी निवडणूक कालखंडाच्या तोंडावर एकमेकांसमोर थेट मैदानात उतरल्याचे स्पष्ट चित्र रविवारी पहायला मिळाले. यातील भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेत गेली अनेक वर्ष सातत्यच आहे. हिंदुत्वरक्षणाबरोबरच सर्वांचा विकास, वेगवान विकास हे धोरण घेऊनच भारतीय जनता पक्ष देशभरातील जनतेची पसंती मिळवत वाढतो आहे. आपण जंग जंग पछाडले तरी भारतीय जनता पक्षाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता तसुभरही कमी होत नाही आणि काही तुरळक अपवाद वगळता भाजपला निवडणुकांच्या मैदानात नजरेत भरण्यासारखे यशच मिळते हे पाहून खरे तर एकंदरच विरोधकांचे उरलेसुरले अवसानही गळून गेले आहे. परंतु उगाच आव आणून एकीचे पुकारे करताना यातील बहुतांश पक्ष हळूहळू हिंदुत्वाचा आधार घेऊ पाहात आहेत. अगदी काँग्रेस पक्षाचे आघाडीचे नेतेही अधुनमधुन हिंदूंना प्रेमळ साद घालण्याच्या प्रयत्नात असल्यासारखे वागतात. अशा वातावरणात आपले आक्रमक हिंदुत्व गुंडाळून ठेवून तथाकथित निधर्मी पक्षांच्या सोबतीने सरकार थाटू पाहणारे उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाचा गजर करताना दिसले तर त्यात आश्चर्य ते काय? उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही मुद्यांचा आधार घेतला तरी त्यांचा खरा रोख एकनाथ शिंदे विरोधाचा आहे हेही लपून राहात नाहीच. रविवारच्या ‘वज्रमूठ’ सभेत उद्धव ठाकरे यांनी सतत हिंदुत्वाचाच गजर केला असला तरी गेल्या सहा-आठ महिन्यांप्रमाणेच आगामी काळातही महाराष्ट्रातील जनतेला एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे हाच संघर्ष पहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेनंतर रविवारी राज्यातील गावोगावी निघालेल्या सावरकर गौरव यात्रा आणि त्याचवेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेली वज्रमूठ सभा ही याच शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्षाचा भाग होती. हिंदुत्वाचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला यापुढे गत्यंतर नाही हे पुरते ओळखूनच महाविकास आघाडीतील कथित निधर्मी पक्षांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारलेले दिसते. परंतु आपला हा हिंदुत्वाचा अभिनिवेश नेमका कसा आणावा याबाबतीत ही आघाडी अद्यापही बव्हंशी गोंधळातच आहे. त्यामुळेच ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तमाम हिंदूंना सार्थ अभिमान आणि आदर वाटतो त्यांच्याचविषयी आव्हानात्मक भाषा ठाकरे यांच्या भाषणात दिसून आली. जगातील सर्वात शक्तिमान हिंदू नेता पंतप्रधान असतानाही हिंदूंना जनआक्रोश मार्चे काढावे लागत असतील तर त्या शक्तीचा उपयोग काय, असा सवाल करीत उद्धव यांनी थेट मोदी यांना लक्ष्य केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाताना उद्धव ठाकरे यांनी आपले हिंदुत्व गुंडाळून ठेवले अशी टीका वारंवार झाल्यानेच उद्धव ठाकरे आता अधिकच मोठ्यांदा आपली हिंदुत्वाची भूमिका मांडत आहेत हे न कळण्याइतकी महाराष्ट्राची जनता भाबडी नाही हे त्यांनी लक्षात घेतलेले बरे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply