तातडीने कार्यवाही करण्याचे मंत्री दादाजी भुसे यांचे आश्वासन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल एसटी बस आगाराच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला आहे. त्यानुसार पुन्हा एकदा त्यांनी हा प्रश्न विधिमंडळात मांडून याकडे शासनाचे लक्ष वेधत प्रवाशांना न्याय देण्याची मागणी केली. पनवेल बस आगाराचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले पाहिजे ही आमदार प्रशांत ठाकूर व प्रवाशांची अपेक्षा आहे. त्या दृष्टिकोनातून तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्री दादाजी भुसे यांनी सभागृहात दिले.
पनवेल येथील अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगाराच्या नूतनीकरण कामाला मंजुरी मिळून बराच कालावधी होऊनसुद्धा अद्यापपर्यंत कामाला सुरूवात झालेली नाही. या बस आगारात अनेक प्राथमिक पायाभूत सुविधांअभावी बसचालक, प्रवासी तसेच नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. आगाराच्या नूतनीकरण कामाबाबत वारंवार शासन दरबारी पाठपुरावा करूनसुद्धा संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळेच कामाला विलंब झाला आहे. परिणामी बस आगारातील अनेक गैरसोयींमुळे नागरिक व प्रवाशांमध्ये पसरलेल्या चिडीच्या व असंतोषाच्या भावना पाहता शासनाने तातडीने लक्ष घालून या बस आगाराचे नूतनीकरण करण्याची आवश्यकता असून याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही व उपाययोजना करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनाद्वारे विधानसभेत केली.
ठेकेदाराला शासनाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. कराराच्या अंतर्गत असलेल्या अटी-शर्तींचा अवलंब करावा लागेलच, पण अक्षम्य दिरंगाई आहे. मुद्रांक शुल्क किती असावे हे ठरविण्यासाठी जर वेळ जात आहे, तर शासनाच्या सर्व प्रक्रियामध्ये लोकांनी किती खस्ता खायच्या. कंत्राटदाराने कुठल्या अटींचे पालन केले आहे की त्याला आपण कारणे दाखवा नोटीस व नंतर सहानभूती दाखवणार. त्यामुळे आता ही नोटीस दिल्यानंतर किती कालावधीमध्ये पुढची प्रक्रिया पूर्ण करणार? किती कालावधीमध्ये हे काम सुरु होईल? आणि या कंत्राटामध्ये उशीर करणार्यावर अधिकार्यांवर कोणती कारवाई करणार, असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित करून पनवेल बस आगाराचे काम लवकरात लवकर काम सुरू करण्याची आग्रही पुनर्मागणी केली.
यावर मंत्री दादाजी भुसे यांनी, कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे नैसर्गिक तत्वानुसार ठेकेदाराला नोटीस दिली आहे. त्या नोटिसीवर कालावधीत त्यांचे म्हणणे योग्य नसेल तर ताबडतोब कारवाई केली जाईल. प्रवासी हे आपले दैवत आहेत. म्हणून प्रवाशांना ज्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल, असे सभागृहात आमदार प्रशांत ठाकूर यांना आश्वासित केले.
मविआ सरकारने केला होता खोळंबा
पनवेल परिसर झपाट्याने विकसित होत असताना नागरीकरणामध्ये होणारी वाढ पाहता पनवेलचे बसस्थानक सर्व सुविधांयुक्त असावे, अशी प्रवाशांची मागणी होती. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बस आगारात आंदोलनही केले होते. त्यानंतर कायम पाठपुरावा केला. तत्कालीन फडणवीस सरकारने या कामास मान्यताही दिली, मात्र त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने याकडे लक्ष दिले नाही आणि याचा खोळंबा केला होता. आता पुन्हा एकदा हा प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी ऐरणीवर आणत मार्गी लावण्यासाठी विधिमंडळात मांडला.