Breaking News

जबरी चोरी करणारी टोळी गजाआड

अवघ्या दोन तासांत पोलिसांकडून अटक

पनवेल ः वार्ताहर
ओलाचालकाच्या कारला कट मारून त्याला शिवीगाळ करून त्याच्या खिशातील पाकीट व कारमधील दोन मोबाईल फोन जबरीने काढून घेणार्‍या पाच सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात खुन, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैध शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणातील फिर्यादी राजन पारस चौधरी (वय 22, रा. मुंबई) यांच्या गाडीत नेवाळी येथून तिघे जण डोंबिवली येथे जाण्यासाठी बसले. डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे आले असता त्यांच्या कारला एका रिक्षाने कट मारून रिक्षा कारच्या पुढे उभी केली. रिक्षातून दोन जण खाली उतरुन ते फिर्यादींना शिवीगाळ करुन त्यांच्या खिशाची तपासणी करू लागले. त्यानंतर कारमध्ये बसलेले इतर तीन जणांसह या पाचही आरोपींनी फिर्यादीला मारहाण करून त्यांचे खिशातील पाकीट व कारमध्ये ठेवलेले त्यांचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेऊन रिक्षातून पळून गेले. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मानपाडा पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी तत्काळ वेगवेगळ्या टीम तयार करून तपासाची चके्र फिरविली. या भागातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी आरोपी चंद्रकांत उर्फ मोठा चट्या जमादार, शिवा तुसंबल, सत्यप्रकाश कनोजिया यांना अटक केली. यासोबत एका विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांच्याकडून चोरलेली रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच इतर गुन्ह्यात चोरलेले एकूण नऊ मोबाईल फोन, एक लॅपटॉप, रोख रक्कम, रिक्षा असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुख्य आरोपीवर आधीच तडीपारची कारवाई
या प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रांकांत जमादार हा तडीपार असून त्याच्यासह इतर आरोपींवर डोंबिवली, टिळकनगर, खडकपाडा, हिललाईन पोलीस ठाण्यात खून, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी, दुखापत, सरकारी नोकरास दुखापत, अवैधरित्या शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply