Breaking News

दिलासादायक! महामार्गावरील अपघातांत घट

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वर्षभरात केवळ 45 नोंदी

पनवेल : वार्ताहर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जात होता. या महामार्गावर दिवसाआड अपघाताच्या घटना घडत होत्या, मात्र कोरोना संसर्गातील 2020 हे वर्ष या अपघातासाठी अपवाद ठरले आहे. कारण या अपघाताच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. 2020 या पूर्ण वर्षात केवळ 45 अपघातांची नोंद झाली आहे. या 45 अपघातांत 15 व्यक्तींना आपल्या प्राणांना मुकावे लागले, तर 56 व्यक्ती जखमी झाल्याची नोंद आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा मृत्यूचा महामार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. कारण या महामार्गावरील अतिवेग हेच या मृत्यूचे कारण ठरले आहेत. 90 किमी अंतराच्या मार्गावर काही चालक बेफाम होऊन आपली वाहने चालवताना दिसून येतात आणि आणि हा बेफामपणा वाहनाच्या अपघाताना आमंत्रण देत आहे. द्रुतगती महामार्गाची सुरुवात झाल्यानंतर शेकडो अपघातांची नोंद या महामार्गावर झाली आहे. अनेक व्यक्तींना या महामार्गावर मृत्यूच्या सामना करावा लागला आहे. हे अपघात वाढल्यानंतर महामार्गावरील त्रुटींची चर्चा झाली आणि महामार्गावर ठपका ठेवण्यात आला, मात्र हे सर्व अपघात मानवनिर्मित असल्याचे लक्षात आल्यानंतर या अपघातांवर आळा बसवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात झाली.

यामध्ये वेग मर्यादेवर अंकुश बसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच लेनच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन वाहनचालकांना करण्यात आले. लेनची शिस्त मोडणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ लागला. या कामात महामार्ग पोलिसांचे योगदान मोलाचे ठरू लागले आहे. दिवसरात्र या महामार्गावर गस्त घालून व सोबत जनजागृती करून चालकांमध्ये शिस्त निर्माण करण्यात त्यांना यश आले. अशातच कोरोना काळात वाहतूक कमी होती. त्यामुळे महामार्गावरील अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. 2018 व 2019मध्ये या महामार्गावरील अपघातांच्या संख्येने शंभरी पार केली होती, मात्र 2020मध्ये अपघातांत घट झाली आहे.

वाहनचालकांच्या चुकीमुळे अपघात

वर्षभरात केवळ 45 अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये प्राणांकित अपघाताची संख्या 14 होती. यामध्ये 15 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर 24 व्यक्ती या जखमी झाल्या आहेत. यासोबतच गंभीर अपघातांची संख्या ही 10 इतकी असून, 18 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. किरकोळ अपघाताची संख्या नऊ इतकी असून, यामध्ये केवळ 14 व्यक्ती जखमी झाल्या आहेत. हे सर्व अपघात वाहनचालकांच्या चुकीमुळे झाले असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये अतिवेग, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, तसेच 24 तास वाहन चालवणे हे अपघाताचे खरे कारण ठरू लागले आहेत.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply