अलिबागेतील आदिवासी विद्यार्थिनीवर कौतुकाचा वर्षाव
अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील श्रीगाण आदिवासी वाडीवर राहणारी आदिवासी विद्यार्थिनी प्रगती नाईक हिचे गुरुवारी (दि. 13) दुपारी लग्न झाले, परंतु लग्नापूर्वी ती टीवायबीकॉमचा शेवटचा पेपर लिहून आली. हळदीच्या अंगाने पेपर लिहून परीक्षेचे कर्तव्य बजावणार्या प्रगतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयात शिकणारी प्रगती ही तीनविरा परिसरातील पदवीपर्यंत शिक्षण घेणारी पहिली आदिवासी मुलगी आहे. घरची परिस्थिती बेताचीच असताना तिने सर्व संकटांवर मात करीत जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले. मैनुशेठचा वाडा येथे राहणारे सुहास म्हात्रे व अनुजा म्हात्रे या दाम्पत्याने तिला शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. प्रगतीचा गुरुवारी टीवायबीकॉमचा एक्सपोर्ट मार्केटिंगचा शेवटचा पेपर सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत होता. हा पेपर लिहून दुपारी 2 वाजता ती विवाहबंधनात अडकली. आधी लगीन कोंढाण्याचे या उक्तीप्रमाणे तिने भावनेपेक्षा आपले कर्तव्य महत्त्वाचे मानले. आधी परीक्षेचा पेपर देऊन ती बोहल्यावर चढली.
सुहास म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रगतीला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. सुरुवातीपासूनच तिची शैक्षणिक प्रगती चांगली राहिली आहे. शेतीची व इतर कामे करून ती शिक्षण घेत आहे.
शेवटच्या पेपरआधी जेएसएम कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी तिला पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील यांनी तिला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. आदिवासी समाजाची मुलगी आमच्या महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून आपली प्रगती करीत आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. विवाहबंधनात अडकण्याच्या आनंदापेक्षा तिने आपले शिक्षणाचे कर्तव्य अधिक श्रेष्ठ मानले याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशी प्रतिक्रिया गौतम पाटील यांनी दिली.