Breaking News

वाढत्या तापमानामुळे काळजी घ्या

नवी मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन
रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
सद्यस्थितीत वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे प्रकृतीवर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी उन्हात कामाशिवाय घराबाहेर पडू नये व स्वत:ची व कुटुंबियांची काळजी घ्यावी असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले की माणसाच्या शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा प्रभावीपणे काम करेनाशी होते आणि उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ व उलट्या होणे, डोके दुखणे, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे, प्रसंगी आकडी येणे अशी विविध प्रकारची लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी घाबरून न जाता तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राशी, रुग्णालयाशी संपर्क साधावा असे सूचित करण्यात येत आहे.
सध्या तापमानातील प्रचंड वाढीमुळे उष्णतेचे आजार व उष्माघात टाळण्यासाठी तहान लागलेली नसली तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे, हलके पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरणे, बाहेर जाताना गॉगल, छत्री अथवा टोपी, बूट अथवा चप्पल यांचा वापर करावा तसेच प्रवास करताना नेहमी पाण्याची बाटली सोबत ठेवावी असेही आवाहन करण्यात येत आहे. तर उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नेरुळ येथील मिनाताई ठाकरे रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. उन्हात काम करणा-या व्यक्तींनी डोक्यावर टोपी अथवा छत्रीचा वापर करावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे जाणवल्यास ओआरएस, घरी बनविलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक अशी पेये नियमित घ्यावीत. शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या दरम्यान योग्य ती काळजी घ्यावी. खेळाच्या तासातील मैदानी खेळ सकाळी 9.30 च्या आधी संपवावेत असे सूचित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आऊटडोअर क्टिव्हिटी सायं. 5 नंतर ठेवाव्यात जेणेकरून सुर्यप्रकाशाची तीव्रता कमी जाणवेल. तसेच दर तासाला पाणी पीने, शाळांमध्ये टोपी घालणे अनिवार्य करावे आणि फळांचे सेवन वाढवावे असेही सूचित करण्यात येत आहे.
उन्हाचा त्रास होऊ लागल्यास तात्काळ नजीकच्या महानगरपालिका आरोग्य केंद्राशी अथवा रुग्णालयाशी संपर्क साधावा. याठिकाणी उष्णलहरी बाधित रुग्णांवर आवश्यक उपचार तातडीने करण्याची व त्यासाठीचा आवश्यक औषध साठा करून ठेवण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत आरोग्य विभागाला देण्यात आलेले आहेत.महापालिका आयुक्त यांचे निर्देशानुसार उष्माघाताच्या रूग्णांवर तात्काळ उपचार करण्यासाठी माँसाहेब मिनाताई ठाकरे रूग्णालय, नेरूळ येथे विशेष उपचार कक्ष सुरू करण्यात आलेला आहे.

उच्च तापमानामुळे उष्णतेच्या आजाराचा धोका असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक काळजी घ्यावी. उष्णतेचा वा उष्माघाताचा त्रास नागरिकांना जाणवल्यास त्वरित महानगरपालिकेच्या रुग्णालयाशी किंवा जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.  -राजेश नार्वेकर, पालिका आयुक्त

Check Also

एक दिग्दर्शक, एक वर्ष, चार चित्रपट, सर्वच सुपर हिट; मनमोहन देसाईंची कम्माल…

दिग्दर्शक मनमोहन देसाईंच्या चित्रपटात इतकं आवडण्यासारखे काय असते? माहीत नाही. याचा अर्थ त्याबाबत अज्ञान आहे …

Leave a Reply