पनवेल : पनवेल महानगरपालिकेत खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल येथील सिडको वसाहतीत सिडकोतर्फे पाणीपुरवठा करण्यात येतो. सद्यस्थितीत भासत असलेला पाण्याचा तुटवडा व वितरण व्यवस्था लक्षात घेता सिडको अधिकार क्षेत्रातील या भागांमध्ये पाणीपुरवठ्यात 18 मे पासून 20 टक्के पाणी कपात जाहीर करण्यात येत आहे. पाणी कपातीच्या काळात सिडको अधिकार क्षेत्रातील रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.
डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण
पनवेल : बारवई गावाजवळ एका 27 वर्षीय तरुणास 11 मे रोजी दोघांनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण केली आहे, तालुका पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोयंजे येथील विशाल गजानन मते हा मित्राची मोटारसायकल घेऊन मोहपाडा रसायनी येथे कामानिमित्त जाण्यासाठी निघाला होता. तो बारवई गावाजवळ आला असता तेथे आकाश गोजे, अंकित गोजे, महेश लाड, नंदकुमार गोजे अशा सर्वांनी त्याची मोटारसायकल थांबवली व त्याला शिवीगाळी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महेश लाड व आकाश गोजे या दोघांनी विशाल मते याच्या डोक्यात, पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण केली. यात तो बेशुद्ध पडला. तालुका पोलिसांनी महेश लाड व आकाश गोजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोखंडी स्क्रॅपचा माल चोरणार्यांना अटक
पनवेल : चिखले येथील एका कंपनीतील 400 किलो वजनाचा लोखंडी स्क्रॅपचा माल चोरणार्यांना अटक करण्यात आली आहे. दिलीप यादव व मोहम्मद अन्सारी अशी या चोरांची नावे आहेत. निमेश राम ठोंबरे (31 वर्षे) हे ऑफशोअर कंपनी, चिखले येथे सिक्युरिटी सुपरवायझरचे काम करत आहेत. ऑफशोअर कंपनी, चिखले येथे फॅब्रिकेशन, गॅस, कटिंग, वेल्डिंगची कामे चालतात. सायकांळी गेटजवळ तपासणीकरिता एका ट्रेलरला थांबण्याचा इशारा केला, परंतु तो थांबला नाही व बंद असलेल्या गेटकडे ट्रेलर घेऊन तो जाऊ लागला. त्या वेळी गार्ड प्रभुरेश फडके यांनी पळत जावून क्लिनर बाजूने ट्रेलरमध्ये चढून ट्रेलर थांबविला. त्याच्या केबिनमध्ये सीटच्या खाली कंपनीतील स्क्रॅप केलेला विविध आकाराचा लोखंडी माल दिसला. 400 किलो वजनाचा लोखंडी स्क्रॅपचा माल ट्रेलरमध्ये भरून दिलीप यादव व मोहम्मद अन्सारी हे चोरून घेऊन चालले होते. त्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादावरून मारहाण
पनवेल : विहीघर, महालक्ष्मी सिटी येथील जुन्या वादावरून चार जणांना चौघांनी काठीच्या सहाय्याने मारहाण केल्याची घटना घडली असून आरोपीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र आण्णासाहेब नेमाणे (38 वर्षे) हे आपल्या कुटुंबीयांसह विहीघर येथील महालक्ष्मी सीटीमध्ये राहत आहेत. त्यांच्या सोसायटीत तळमजल्यावर राहणार्या बबन बोरकर याच्यासोबत काही दिवसांपासून वाद होत आहेत. बबन बोरकर व त्याची पत्नी मनीषा यांनी राजेंद्र यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली असता त्यांना का मारता, असे राजेंद्र याने विचारले असता त्यांनादेखील मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतोष व त्यांची आई यांनादेखील त्यांनी मारहाण केली. रघुनाथ पिल्ले, शाम नागपुरे यांनी राजेंद्र यांना पकडून मारण्यास सुरुवात केली. बबन धोंडू बोरकर (वय 35), मनीषा बोरकर (30), रघुनाथ पिल्ले (50), शाम नागपुरे (35) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.