Breaking News

स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर; देवदास मटाले आणि राजन वेलकर मानकरी

कर्जत : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या जयंतीनिमित्त स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. यातील राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले यांना, तर जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार अलिबाग येथील रायगड टाइम्सचे संपादक राजन वेलकर यांना जाहीर करण्यात आला आहे. 27 एप्रिल रोजी कर्जत येथे हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
माथेरान येथील पत्रकार आणि महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागाच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य संतोष पवार यांचे 9 सप्टेंबर 2020 रोजी कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्याचा निर्णय कर्जत प्रेस क्लबने घेतला. त्यानुसार स्व. संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय संपादक पुरस्कार 2022 हा ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले यांना (11 हजार 111 रुपयांचा धनादेश, समानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ), तर रायगड जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार अलिबाग येथील पत्रकार राजन वेलकर यांना (पाच हजार 555 रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कर्जत येथील रॉयल गार्डनच्या वातानुकूलित सभागृहात होणार्‍या या पुरस्कार सोहळ्यास पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, देवेंद्र साटम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, नितीन सावंत, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे आणि संतोष पवार यांच्या मातोश्री सुशीला धोंडू पवार, पत्नी मनीषा पवार यांची उपस्थिती असणार आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply