शिमला, काकडी, फरसबी, वांगीच्या दरात वाढ
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी भाजीपाल्याचे दर वधारले असून शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरात 10 टक्के ते 15 टक्के वाढ झाली आहे. अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेमुळे भाज्यांचे उत्पादन कमी झाले असून दर वाढले आहेत, अशी माहिती व्यापार्यांनी दिली आहे. अवकाळी पाऊस आणि हवामानात होणारे बदल त्यामुळे उत्पादन कमी झाले असून भाज्यांच्या दर्जावर ही परिणाम झाला आहे. एपीएमसी बाजारात आवक कमी होत असून उच्चतम प्रतीच्या भाज्यांचे दर वधारले आहेत.
एपीएमसीत मंगळवारी 594 गाड्यांची आवक झाली असून यामध्ये शिमला मिरची, फरसबी, वांगी आणि काकडीची आवक घटल्याने दर 10% ते 15% वाढले आहेत,अशी माहिती व्यापार्यांनी दिली आहे. मंगळवारी एपीएमसीत काकडी 392 क्विंटल आवक, शिमला मिरची 1482 क्विंटल, फरसबी 76 क्विंटल, वांगी 323क्विंटल, वाटाणा 1045क्विंटल, आवक झाली आहे. टोमॅटो, गवार, भेंडी, कोबी, फ्लॉवर, गाजराचे दर स्थिर असून हिरवी मिरची,हिरवा वाटाणा दर उतरले आहेत, तर शिमला मिरची, वांगी, फरसबी, काकडीच्या दरांनी उसळी घेतली आहे.
आधी घाऊक बाजारात फरसबी प्रतिकिलो 40-45रुपयांनी उपलब्ध होती त्यामध्ये 10 रुपयांची वाढ झाली असून आता 50-55 रुपयांनी विक्री होत आहे. प्रतिकिलो शिमला मिरची आधी 20-22रु होती ती आता 30-32रुपयांनी विकली जात आहे. प्रतिकिलो काकडी 12-14 रुपयांवरून 16-18रुपये तर वांगी प्रतिकिलो 12रुपये होती आता 16 रुपयांनी विकली जात आहेत. एकंदरीत या भाज्यांची 10% ते 15% दरवाढ झाली आहे, तर हिरवी मिरची आणि मटारचे दर मात्र घसरले आहेत. आधी वाटाणा प्रतिकिलो 80 रुपये होता ते आता 60 रुपयांवर उपलब्ध आहे तर हिरवी मिरची 16-20 रुपयांनी विक्री होत आहे.
अवकाळी पाऊस आणि अतिउष्णतेने भाज्यांच्या उत्पादनाला फटका बसला असून दर्जावर ही परिणाम झाला. त्यामुळे एपीएमसी बाजारात काही भाज्यांची आवक कमी होत असून दरवाढ झाली आहे.
-नाना बोरकर, व्यापारी, एपीएमसी