उघडी गटारे, नाले बनले डम्पिंग ग्राऊंड
खोपोली : प्रतिनिधी
लोकल सेवा, मुंबई-पुणे महामार्ग, एक्स्प्रेस वे व मोठया संख्येने कारखानदारीच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहर विकसित शहर बनले आहे. शहरातील पायाभूत सुविधा अधिक मजबुतीसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नवनवीन कल्पना अमलांत आणल्या जात आहेत. यात महत्वकांक्षी भुयारी गटार योजनेचा समावेश आहे. मात्र या ना त्या कारणांनी मागील दोन दशके ही योजना मंजूर होऊनही लालफितीत अडकली आहे. संपूर्ण शहरात उघड्यावर सांडपाणी निचरा होत असल्याने अस्वच्छता, दुर्गंधी व भयंकर डासांनी नागरिक हैराण आहेत.
सार्वजनिक स्वच्छता व रस्ते या बाबतीत खोपोली शहराची स्थिती चांगली नाही. दुसरीकडे मागील दोन दशके अत्यंत महत्वाची खोपोली भुयारी गटार योजना अजूनही लालफितीत आहे. त्यामुळे सर्वत्र उघड्या गटारी व नाल्यात नागरिकांकडून सर्रासपणे घनकचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाले तुंबून सांडपाणी निचरा बाधित होऊन दुर्गंधी, डास मच्छर ही शहराची मोठी समस्या बनली आहे.
पालिकेकडून आवाहन
घरगुती कचरा उचलण्यासाठी सर्व प्रभागात फिरणार्या घंटा गाड्या व्यवस्था खोपोली नगरपालिकेकडून सुरू आहे. सार्वजनिक स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांनी साथ देण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
नागरिकांचा सहभाग वाढण्याची गरज
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या जोडीला नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे. मात्र मोठया संख्येने नागरिक ही सर्व जबाबदारी नगरपालिकेचीच या भावनेत आहेत. त्यामुळे घरगुती कचरा उचलण्यापासून, सार्वजनिक स्वच्छता कायम ठेवण्यात नगरपालिका अपयशी ठरत आहे. प्लास्टीक बंदी असूनही प्लास्टिक पिशव्यांचा आग्रह ही विचित्र मानसिकता शहराचे नुकसान करीत आहे.