मंडल अधिकारी, तलाठ्यांची कारवाई; शासनाकडून पंचनामा
खोपोली ः प्रतिनिधी
धनिकाने तालुक्यातील आसरे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वाकी नदीपात्रात जलसंपदा विभागाची कोणतीही परवानगी न घेता केलेल्या दगडी भिंतीचे बांधकाम केल्याचे उघड केले झाले आहे. याबाबत मंडल अधिकारी किरण पाटील आणि तलाठी अमोल बोराटे यांनी बुधवारी (दि. 24) प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व पंचनामा केला. या वेळी तक्रारदार शेतकरी उपस्थित होते. वाकी नदीपत्राजवळ मुंबईतील धनिकाने जागा खरेदी केली असून, नदीपात्रालगत 180 मीटर लांब व दोन मीटर उंचीची दगडी भिंतीचे बांधकाम केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा लोंढा उजव्या बाजूकडे घुसून जांभिवली भागातील शेती पाण्याखाली जाणार आहे. शेतकरी गेले पाच महिन्यांपासून प्रशासन दरबारी खेटे मारत होते. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. चौक विभागाचे मंडळ अधिकारी किरण पाटील आणि तलाठी अमोल बोराटे यांनी अतिक्रमण असलेल्या ठिकाणी बुधवारी भेट दिली. मंडळ अधिकारी आणि तलाठी वरिष्ठांना काय अहवाल देतात यावर जांभिवली गावातील शेती आणि शेतकर्यांचा भविष्य अवलंबून आहे. पाटबंधारे विभाग कर्जत यांनी नदीपात्रालगतचे बांधकाम अनधिकृत असल्याचे मान्य केले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने तशी नोटीसदेखील पाठवली आहे.
पंचनामाचे काम सुरू असून वस्तूस्थितीप्रमाणे अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जाईल.
-किरण पाटील, मंडळ अधिकारी, चौक विभाग
प्रशासनाकडून अतिक्रमण असल्याचे मान्य केले जात असून देखील कारवाई होत नाही. आमची शेती डोळ्यात देखत नष्ट होताना आम्ही बघू शकणार नाही. त्यामुळे आमरण उपोषणाची वेळ प्रशासनाने आमच्यावर येऊ देऊ नये.
-सुरेश गावडे, शेतकरी, जांभिवली चौक