Breaking News

पनवेल मनपा नगर पथविक्रेता निवडणुकीत भाजपप्रणित पॅनेलचा विजय

पनवेल : प्रतिनिधी
दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान अंतर्गत ’फेरीवाल्यांना सहाय्य या घटकांतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या नगर पथविक्रेता समितीच्या सन 2023-24साठी निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. 8) आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जाहीर करण्यात आला. या निवडणुकीमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक निलेश बाविस्कर, प्रदिप भगत व गोपाळ भगत यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने विजय मिळविला.
इतर मागास प्रवर्गामध्ये प्रतिक्षा अनिल माळी, विकलांग महिला राखीव प्रवर्गामध्ये अंजू राजू कोळी, सर्वसाधारण प्रवर्गामध्ये अनिकेत पांडुरंग थोरात, मंगेश पंढरीनाथ गोवारी,सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गामध्ये आशा राजू मोरे, विजयी झाले. अनुसूचित जाती प्रवर्गातून भिकाजी सुखदेव लोंढरे बिनविरोध निवडून आले.
आठ नगर पथविक्रेता सदस्यांसाठीची 2023 ते 2028करिताची पंचवार्षिक निवडणूक  बुधवारी संबंधित चारही प्रभागामध्ये घेण्यात आली होती. या निवडणुकीसाठी 13 उमेदवारांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीसाठी एकुण 3 हजार 76 मतदार होते. यावेळी 59.30 टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी चार प्रभाग समिती अंतर्गत चार मतदान केंद्रावरती हे मतदान घेण्यात आले होते. आठ सदस्यांपैकी एका अनुसूचित जाती पदासाठी एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले असल्याने या प्रवर्गातील जागा बिनविरोध निवडून आली. तसेच अनूसुचित जमाती व अल्पसंख्यांक प्रवर्गासाठी एकही नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे एकुण पाच प्रवर्गासाठी एकुण 13 उमेदवारांनी निवडणुक लढविली.
निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना निवडणुक निर्णय अधिकारी शितल कुलकर्णी आणि नोडल अधिकारी उपायुक्त कैलास गावडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी  सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच सर्व उमेदवारांचे आभार मानले.
या निवडणुकीसाठी दिनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान विभागाचे विभाग प्रमुख हरेश जाधव, तांत्रिक अधिकारी विनया म्हात्रे, नवनाथ पवार, विभागातील सर्व कर्मचारी तसेच चारही प्रभागाचे प्रभाग अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply