Breaking News

मुरूड, नेरळमध्ये सफाई कर्मचारी वेतनाविना

मुरूड : प्रतिनिधी – येथील नगर परिषदेच्या सफाई कर्मचार्‍यांना एप्रिल व मे महिन्यांचे वेतन अद्यापर्यंत न दिल्याने हे कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रतिकूल परस्थितीत इमानेइतबारे काम करूनसुद्धा दोन महिन्याचे वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात मानवाधिकार संघटनेने जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधले आहे.

लोकप्रतिनिधी व नगर परिषदेच्या अधिकारीवर्गाला भेटूनही कोणताच मार्ग न निघाल्याने या सफाई कर्मचार्‍यांनी मानवाधिकार संघटनेचे उपाध्यक्ष जाहिद फकजी यांची भेट घेऊन झालेल्या अन्यायाची कैफियत मांडली. फकजी यांनी मुख्याधिकार्‍यांशी पत्रव्यव्हार केला, मात्र त्यांच्याकडूनदेखील सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी पत्रव्यहार करून कामगारांसाठी दाद मागितली आहे.

प्रस्तावाला मंजुरीची प्रतीक्षा

याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने मुरूड नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी राकेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शहरच्या स्वछतेचा ठेका गंगोत्री कंपनीस देण्यात आला होता. त्याचा करार मार्च महिन्यात संपुष्टात आला. कोरोना साथीमुळे नवीन टेंडर काढता आले नाही. म्हणून ठेकेदारास दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. त्यास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला आहे. प्रस्ताव मंजूर होताच गंगोत्री कंपनीस पेमेंट अदा केले जाईल.

कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील मोठ्या समजल्या जाणार्‍या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये काम करीत असलेल्या सफाई कामगारांना मागील तीन महिने पगार देण्यात आलेला नाही. या कामगारांना 18 ऑगस्टपूर्वी पगार देण्यात आला नाही, तर नेरळ ग्रामपंचायतीविरुद्ध उपोषण करण्याचा इशारा आरपीआय (आठवले गट)च्या वतीने देण्यात आला आहे.

आरपीआय आठवले गटाच्या वतीने नेरळ गावात ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल ताशेरे ओढणारे फलक लावण्यात आले आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवास्तव खर्च करीत कचराकुंड्या बांधल्या आहेत. गावात जुन्या कचराकुंड्या असताना करण्यात आलेला खर्च भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा आहे. त्याचवेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेल्या वस्तू तसेच सॅनिटायझर यांच्यात मोठा घोटाळा झाला आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.

कोरोना संकटकाळात सफाई कामगारांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळेच नेरळसारख्या शहरवजा गावात कोरोनाची फैलाव मोठ्या प्रमाणात झाला नाही. असे असताना ग्रामपंचायतीकडून सफाई कामगारांचा पगार दिला जात नाही ही बाब निंदनीय आहे. सफाई कामगारांचा राहिलेला तीन महिन्यांचा पगार 18 ऑगस्टपूर्वी दिला नाही, तर आरपीआय नेरळ ग्रामपंचायतीविरुद्ध उपोषणाचे हत्यार उपसणार आहे, असा इशारा आरपीआयचे नेरळ अध्यक्ष अनिल सदावर्ते यांनी दिला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply