पाणीटंचाईप्रश्नी बैठकीत काढला तोडगा
खोपोली ः प्रतिनिधी
नगरपंचायत हद्दीत असलेल्या महड तीर्थक्षेत्री तीव्र पाणीटंचाईमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांची तहसील कार्यालय खालापूर येथे शुक्रवारी (दि. 9) बैठक झाली. तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मध्यस्थीने पाणीप्रश्नी तोडगा निघाला असून खासगी बोअरवेल बंद करण्याचे निर्देश या वेळी त्यांनी दिले.
महड गावात महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई आहे.आठवड्यापूर्वी महड ग्रामस्थ नगरपंचायत कार्यालयावर धडकल्या होत्या. महड गावाची विहिरीवर पेयजल योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गावातील विहिर सध्या कोरडी पडल्याने त्यामध्ये बोरवेलद्वारे पाणी टाकण्यात येत होते, परंतु परिसरात व्यावसायिक कारणासाठी खासगी बोरवेलमधून प्रचंड उपसा होत असल्याने विहिरींसाठी असलेली बोअरवेल कोरडी पडली.
जवळपास 250 ते 300 कुटुंबासाठी ही योजना आहे. सध्या बोअरवेल पण कोरड्या पडल्याने पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले. अखेर महड ग्रामस्थ, खालापूर नगरपंचायत यांची संयुक्त बैठक तहसीलदार आयुब तांबोळी यांनी घेतली. यामध्ये खासगी बोअरवेल तातडीने बंद कराव्या या ग्रामस्थांची मागणी तहसीलदार यांनी मान्य केली.