Breaking News

शिवराज्याभिषेक सोहळ्यात एसटीची दमदार कामगिरी

पावणे पाच लाखांहून अधिक शिवप्रेमींनी केला प्रवास

महाड : प्रतिनिधी  
रायगडावर नुकत्याच झालेल्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये आलेल्या लाखो शिवप्रेमींना गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचवण्याची दमदार कामगिरी एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी केली. 1 ते सात जून या कालावधीमध्ये सलग सात दिवस एसटीच्या दीडशे बसेस कोंझर ते रायगड पायथा वाय जंक्शन अशा धावत होत्या. यातून सुमारे चार लाख 70 हजार शिवभक्तांनी प्रवास केल्याची माहिती महाड एसटी आगारप्रमुखांनी दिली.
राज्य शासनाच्या वतीने किल्ले रायगडावर 350वा शिवराज्याभिषेक जल्लोषात साजरा झाला. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी राज्यातल्या कानाकोपर्‍यातून लाखो शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले होते. या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी गेले महिनाभर सुरू होती. विविध प्रकारच्या नियोजनात एसटी बससेवा महत्त्वाची होते. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोंझर घाटामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता कोंझर आणि वाळसुरे गावाजवळ पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. या पार्किंग व्यवस्थेपासून रायगडपर्यंत जवळपास दीडशे एसटी बसेस सोडण्यात आल्या. एसटीमुळे शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये वाहतूक कोंडीचे विघ्न टाळता आले. एसटीच्या या दमदार कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
अशी होती सज्जता
सात दिवस महाड आगारासह रायगड विभाग, सातारा विभाग, रत्नागिरी विभाग यांच्या जवळपास 150 बसेस उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे 300 चालक, 25 मेकॅनिक, चार सुपरवायझर, तर 12 वाहतूक नियंत्रक नेमण्यात आले होते. याशिवाय सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, विभाग नियंत्रक दीपक घोडे, यंत्र अभियंता पंकज डावरे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक सरडे, तसेच महाड आगारप्रमुख रितेश फुल पगारे, स्थानक प्रमुख शिवाजी जाधव सज्ज होते. पार्किंग ठिकाण ते रायगड पायथा वाय जंक्शन इथपर्यंत अंदाजे नऊ किमीचा प्रवास एसटीद्वारे शिवभक्तांनी केला. साधारण 15,670 फेर्‍या झाल्या व यातून सुमारे चार लाख 70 हजार शिवभक्तांनी प्रवास केला.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार महाड एसटी आगाराने शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता सुमारे 150 बसेसचे नियोजन केले होते. चालकांनी आपली सेवा बजावत लाखो शिवप्रेमींना सुरक्षितरित्या प्रवास घडवून आणला. 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सेवा करण्याची संधी मिळाल्याने एसटी कर्मचारी आनंद व्यक्त करीत आहेत.
-रितेश फुलपगार, प्रमुख, महाड एसटी आगार

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply