Breaking News

मावळच्या विकासासाठी महायुतीच्या बारणेंचा संकल्पनामा

ना. गिरीष बापट यांच्या हस्ते प्रकाशन

मोहोपाडा : रामप्रहर वृत्त : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून झोपडपट्टीधारकांना 500 स्क्वेअर फुटाचे हक्काचे घर उपलब्ध करुन देणे, आयटी सुविधा, तरुणांसाठी रोजगार, शैक्षणिक धोरण, औद्योगिक धोरण, रेल्वे सुविधा वाढविणे, रस्ते दळणवळण सुधारणा व जलवाहतूक, पर्यटन विकास, बंदर विकास करणे आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणी करण्याचा संकल्प महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-आरपीआय (ए)-रासप-शिवसंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या ’संकल्पनामा’चे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) प्रकाशन करण्यात आले. पिंपरीत झालेल्या या कार्यक्रमाला खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, महापौर राहुल जाधव, शिवसेनेचे संपर्कनेते बाळाभाई कदम, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, भाजप प्रदेश नेत्या उमा खापरे, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेवक बाबू नायर, अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे उपस्थित होते.

संकल्पनामातील ठळक बाबी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सन 2020 पर्यंत चालू करण्याचा केंद्र सरकारचा मनोदय आहे. वेळोवेळी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर हे विमानतळ सुरू करण्याचा माझा प्रयत्न राहील.

रेल्वे सुविधा वाढविणार

पुणे-लोणावळा तिसर्‍या व चौथ्या मार्गाचे काम लवकरच पूर्ण करून लोकलच्या फेर्‍या वाढविणे, रेल्वे मार्ग दुरुस्त करुन विजेचे खांब आणि रेल्वे याच्यांमधील अंतर वाढवणे, पुणे-मुंबई लोकल सेवा, पनवेल रेल्वे स्टेशनचे विस्तारीकरणाचे आदी कामे लवकर सुरू करण्यासाठी पाठपुरावा, गावांना जोडणार्‍या रेल्वे क्रॉसिंगवर अंडरपास सबवे निर्मिती करण्याचा संकल्पही बारणेंनी या निमित्ताने केला आहे.

नदी सुधारणा प्रकल्प

नद्यांमधील जलप्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार. जलप्रदूषण प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याचा पाठपुरावा करणार. नदीघाट परिसर विकास करणार, पवना, इंद्रायणी, आंद्रा, कुंडलिका, उल्हास, पाताळगंगा, पेज, मुळा या नद्यांना केंद्र सरकारडून निधी मंजूर करुन नदी सुधार प्रकल्प राबविणार.

पर्यटन विकास

मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा, खंडाळा, माथेरान येथील स्थळांचा पर्यटन विकास करणे.

बंदर विकास

जेएनपीटी बंदरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी बंदर विकासाकडे प्राधान्याने लक्ष देणार.

Check Also

उरणमधील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखोंचा गैरव्यवहार करणार्‍या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखों रुपयांचा अपहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्याविरोधात उरण …

Leave a Reply