ना. नारायण राणेंचा निशाणा
कणकवली ः प्रतिनिधी
महाराष्ट्रात सरकार आहे की नाही हे मला कळत नाही. एसटी महामंडळातील कामगार पगारासाठी आत्महत्या करीत आहेत. ही भयानक अवस्था आहे. या प्रश्नांकडे ठाकरे सरकारचे लक्ष नाही. फक्त नारायण राणे कुठे जातात याकडे लक्ष आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान कणकवलीत केला.
जनआशीर्वाद यात्रा शेवटच्या टप्प्यात सिंधुदुर्ग या ना. नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात असून तिथे त्यांनी सभा घेत जनतेशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले, आज आमची सभा कणकवलीमध्ये आहे. येथे तुफान गर्दी आहे. सात आठ हजारांच्या संख्येने लोक जमले आहेत आणि शिवसेनेच्या कार्यालयासमोर 53 माणसे. ही अवस्था आहे. एक सांगतो, आमच्या विरोधात काहीही चालणार नाही, चालूही देणार नाही आणि म्हणून आधी चांगला कारभार करा.
मला मिळालेल्या या खात्यामुळे मी जनतेला आर्थिक सक्षम करू शकतो. आपण नको ते उद्योग सोडून देऊया आणि आपल्या प्रगतीसाठी हवे ते उद्योग करूया. यासाठी पुण्यामध्ये एक ट्रेनिंग सेंटर तयार होणार आहे. तेथून तुम्हाला सर्व माहिती मिळेल. यापूर्वी कोकणातील बांधव हा मुंबई, पुण्याला नोकरीसाठी जात होता, मात्र आता या ठिकाणी उद्योग निर्माण करून अनेकांना रोजगाराची संधी दिली पाहिजे, असे ना. राणे म्हटले.
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आमदार आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.