पनवेल : बातमीदार
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल येथील न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीप्रसंगी विशेष सरकारी अभियोक्ता प्रदीप घरत यांना सहाय्य करण्यासाठी यापुढे आता प्रत्येक तारखेस या गुन्ह्यातील सुरुवातीच्या काळात तपास अधिकारी राहिलेल्या पोलिस उपअधीक्षक संगीता अल्फान्सो शिंदे यांना उपस्थित राहण्याची परवानगी राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दिली आहे. बिद्रे हत्याकांड प्रकरणाच्या गुन्ह्यात तपास अधिकारी राहिलेल्या संगीता शिंदे-अल्फान्सो यांना या गुन्ह्यातील बरीच माहिती असल्याने न्यायालयात सुनावणीच्या वेळी त्यांची मदत भासू शकते म्हणून सुनावणीच्या प्रत्येक तारखेस त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी परवानगी देण्याची मागणी विशेष सरकारी अभियोक्ता प्रदीप घरत यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे 5 डिसेंबर रोजी केली होती. त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने पोलीस महासंचालकांनी परवानगी दिल्यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारांबे यांनी 12 डिसेंबरला याबाबत कोकण विभागाचे विभागीय समाजकल्याण अधिकारी व नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना बिद्रे प्रकरणात यापुढील होणार्या प्रत्येक सुनावणीप्रसंगी घरत यांना मदत करण्यासाठी कोकण विभागीय समाजकल्याण विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या पोलीस उपअधीक्षक संगीता अल्फान्सो शिंदे यांना उपस्थित राहण्यास सांगितले. याबाबत नवी मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कदम यांनी 17 डिसेंबरला विभागीय समाजकल्याण अधिकार्यांना पोलीस महासंचालकांनी दिलेल्या आदेशाबाबत अवगत करून संगीता अल्फान्सो शिंदे यांना 19 डिसेंबरला होणार्या सुनावणीप्रसंगी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार त्या गुरुवारी पनवेल न्यायालयात उपस्थित होत्या. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 10 जानेवारी 2020 रोजी होणार असल्याचे न्यायमूर्ती राजेश असमर यांनी सांगितले.