Breaking News

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शिवनेरी बसला अपघात; सात जण जखमी

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटातील खोपोली बायपासजवळ ढेकू गावाच्या हद्दीत शिवनेरी बसने ट्रकला मागून धडक दिल्याने चालक व सहा प्रवासी असे सात जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (दि. 4) रात्री 11.30च्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार शिवनेरी बस (एमएच 12-व्हीएफ 3924)वरील चालक विकास लाड (वय 40, रा. पुणे) हा स्वारगेट ते ठाणे या बसमधून सहा प्रवाशांसह एक्स्प्रेस वेवरून प्रवास करीत होता. उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने या बसने तिसर्‍या लेनमधून चालणार्‍या ट्रकला (एमएच 10-डीटी 4293) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसची केबिन दबल्याने चालक लाड अडकला होता. त्याला आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीम मेंबर्सनी कसोशीने प्रयत्न करून बाहेर काढले आणि कामोठे एमजीएम रुग्णालयाकडे रवाना केले आहे, तर बसमधील सहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात आणण्यात आले. या जखमींमध्ये मंदार माळेकर (39, घाटकोपर), अक्षय कुमार स्वादे (29), निमय नाडकर्णी (29, नेरूळ), अनुजा साबळे (27), ज्योती साबळे (28, सांताक्रूझ, मुंबई), मालू शिशुल शिंगाडे (32, पुणे) यांचा समावेश आहे. यापैकी मात्र मंदार माळेकर व अक्षय स्वादे यांना जास्त मार लागल्या असल्याने त्यांनाही एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले, तर बाकी प्रवाशांना प्रथमोपचार केल्यानंतर सोडण्यात आल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
या अपघातातील बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शितल कुमार राऊत करीत आहेत.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply