उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्रीगणेश जयंती म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. पनवेल, उरणमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र येवून गणेशजयंती साजरी करतात, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत हा उत्सव साजरा करण्यात आला. आधी मंदिरापुरता मर्यादित असलेला माघी गणेशोत्सव आता सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पनवेलसारख्या ठिकाणी साजरा होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे घरगुती स्वरुपातही माघी गणेशोत्सव साजरा होत आहे. पनवेल शहर आणि ग्रामीण भाग, उरण तालुक्यात माघी गणपती उत्सव सुरक्षित अंतर राखून साजरा करण्यात आला. प्रामुख्याने तालुक्यातील चिरनेर, सोनारी, केगाव विनायक, बोकडविरा, उरण शहर गणपती चौक, खोपटे, दिघोडे एमआयडीसी आदी गणेश जन्माष्टमीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या संकटाचे भान ठेवून ठिकठिकाणच्या मंदिर परिसरात प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर व तापमान तपासणीची व्यवस्था करण्यात आली होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भक्तगणात कमालीची घट पहावयास मिळत आहे. या शिवाय गणपतींच्या पालख्या आणि जत्रेवर निर्बंध घातल्याने श्रींच्या दर्शनासाठी येणार्या भक्तांचा ओघ कमी जाणवला. दरवर्षी तीन दिवस असणारे कार्यक्रम फक्त एकच दिवस ठेवण्यात आले होते.
धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रम
पनवेलसह उरणमधील गणपती मंदिरांमध्ये पहाटेपासुन अभिषेक, काकड आरती, प्रवचन, भजन, किर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रमाणे सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्यता आले होते.