Breaking News

पोलादपूर तालुक्यातील सदनिकेचा प्रकल्प रखडला

पोलादपूर तालुक्यातील विविध भ्रष्टाचाराचे मनोरंजक किस्से पावसाळ्यात चहाचे घोट घेताना नाक्यानाक्यावर चर्चेत येत असतात, मात्र यासाठी भ्रष्टाचार घडून गेल्यानंतर त्याला जनतेमध्ये कोणी कसा किती फायदा करून घेतला, याबाबत चर्चा होत असते. यापैकी एका सरकारच्या आवास योजनेची सरमिसळ करून भामट्या भावंडांनी केलेल्या घोटाळ्याची सध्या दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू आहे.
म्हाडा आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या या घरांच्या लॉटरीची चर्चा घडविताना पोस्टरवर पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या फोटोचा वापर भामट्यांनी बिनबोभाटपणे केल्याने लोहारे येथे बालाजी रिसॉर्टसमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार गोगावले, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, प्रकल्पाचे प्रमुख संचालक हनुमंत सावंत, रामदास कळंबे आणि संदीप पालकर, नायब तहसीलदार शरद आडमुठे, निवडणूक नायब तहसिलदार समीर देसाई, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, नगरपंचायतीचे करनिरिक्षक महादेव सरंबळे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे आदी उपस्थित होते.
प्रकल्पाचे प्रमुख संचालक हनुमंत सावंत यांनी योजनेची माहिती देऊन साधारणत: साडेआठ लाखांमध्ये लाभार्थ्यांना स्वत:च्या मालकीचे घर केवळ दोन वर्षांमध्ये मिळणार असून दरमहा पाच हजार रूपये कर्जाचा हप्ता असलेल्या या कर्जप्रकरणात दोन लाख 67 लाख रुपये अनुदान असून केंद्र व राज्य सरकार यांचे अनुक्रमे 40 व 60 टक्के अनुदानाचा भार उचलणार आहेत, अशी माहिती दिली. या वेळी राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी, या योजनेची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याने देशातील कोणीही लाभार्थी या प्रकल्पाचा लाभ घेऊ शकणार असल्याचे सांगून या योजनेचे ऑफलाईन अर्ज नगरपंचायत तसेच नरवीर ग्रुपच्या कार्यालयामध्ये उपलब्ध होणार असल्याने लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी सुरू होण्यापूर्वीच ऑफलाईन नोंदणी करीत आपल्या सदनिकेची नोंदणी करण्याचे आवाहन केले. भाषणाच्या ओघामध्ये योजनेची सत्यासत्यता लक्षात न घेताच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील पार्टेकोंड भागात 720 सदनिकांचा प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारण्यात येणार असल्याने गरीबांसाठीच्या या नियोजित प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी दिली.
या योजनेसाठी पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील पार्टेकोंड येथील डोंगर उताराच्या जमिनीवरील लाल मातीचे मोठया प्रमाणात उत्खनन करण्यात येऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता दुभाजकावर वृक्षारोपण करण्यासाठी भराव टाकण्यासाठी वापरण्यात आले. यावेळी योजनेची माहिती देण्यासाठी उपस्थित राहणार्‍यांपैकीच एका झोलर व्यक्तीने हा ठेका घेऊन शासनाला गौणखनिज उत्खननाची रॉयल्टी न भरताच म्हाडा आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका उभारण्याच्या नियोजित प्रकल्पाच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात लालमातीचे उत्खनन केले आणि त्याठिकाणी सपाटीकरण झाल्यानंतर कबड्डी आणि क्रिकेट सारख्या क्रीडास्पर्धांचे आयोजन करून तालुक्याच्या नावलौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. या उदात्तीकरणाखाली गौणखनिज लालमातीचे उत्खननाची चर्चा विरून गेली. रस्त्याच्या दूतर्फा असलेली महाकाय वृक्षांची सावली नष्ट करून झाल्यानंतर रस्ता दुभाजकावर 4-6 इंच उंचीची झाडे रोपे लावण्याचा आणि पाणी न घालता मरत जगत झाडे वाढवायचा प्रयत्नदेखील याच मानसिकतेतून झाला. दुसरीकडे, म्हाडा आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका उभारण्याच्या नियोजित प्रकल्पाच्या नावाने लॉटरीसदृश्य स्कीम ऑफलाईन पध्दतीने नावनोंदणी करण्याच्या बहाण्याने राबविण्यात आली आणि प्रत्यक्षात पोलादपूर नगरपंचायतीऐवजी नरवीर ग्रुपच्या कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध करण्यात आले.
यानंतर हजारो स्वत:चे घर इच्छिणार्‍यांनी ऑफलाईन प्रत्येकी ठराविक रक्कम जमा करून अर्ज सादर केले. या अर्जांपैकी काही अर्जांची लॉटरीपध्दतीने लाभार्थी निवड करण्यात येऊन ऑनलाईन नोंदणी करण्याचे काम होणार होते, मात्र प्रत्यक्षात ही ऑफलाईन नोंदणी झाली नाहीच उलट सर्वच लाभार्थ्यांची फसवणूक होऊन फसविणारे तालुक्यातील मोठे लोकप्रतिनिधी असल्याने कोणीही तक्रार केली नाही. साधारणपणे जुलै 2021 पासून सुरू झालेला हा उपक्रम वर्षअखेरपर्यंत बिनबोभाटपणे सुरू राहिल्याने लाखो रूपयांचा चुना जनतेला लावण्यात चार भावंडे यशस्वी झाली असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.
या प्रकारानंतर काही माहितीचा अधिकार कार्यकर्त्यांनी पोलादपूर नगरपंचायतीकडे माहितीचा अर्ज दाखल केल्यानंतर सदरच्या योजनेचा नगरपंचायतीचा काहीही संबंध नसून लोकप्रतिनिधी उपस्थित असल्याने पोलादपूर नगरपंचायत हद्दीत सदरचा उपक्रम राबविला जाणार असल्याने नगरपंचायतीचे अधिकारी उपस्थित होते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याचप्रकारे, तहसिल कार्यालयाचे उत्तर प्राप्त झाले असून अन्य जनसेवकांना लोकप्रतिनिधी होते म्हणून आलो आणि योजना कशाप्रकारची होती. आम्हास माहिती नाही, असे सांगून कानावर हात ठेवण्याची इच्छा झाली.
पोलादपूर तालुक्यातील या बहुचर्चित चार भावडांपैकी एक भाऊ राजकारणात तर दुसरा दोन नंबर धंद्यांमध्ये समाजसेवक म्हणून सक्रीय असल्यानेच हे साध्य झाल्याचे फसविले गेलेल्यांचे म्हणणे आहे. याखेरिज, आणखी दोन भावांपैकी एक भाऊ समाजकारण तर दुसरा ’आते जाते हुवे मैं सबपे नजर रखता हूँ… अशी भुमिका घेऊन तालुकाभर फिरस्ता असल्याचा अनुभव सर्वांनीच घेतला आहे. कधी महामार्गावरून कोकणात जाणार्‍या रासायनिक टँकरमधील केमिकल आणि ऑईल चोरी तर कधी स्टील वाहून नेणार्‍या ट्रकमधून स्टीलची चोरी आदी व्यवसाय करणार्‍यांनी नदीमध्ये रिव्हर राफ्टींग आणि डोंगरदर्‍यांमध्ये रॉक क्लायम्बिंग तसेच रेस्क्यू टीमदेखील सुरू करून समाजसेवेच्या ऐतिहासिक नावाखाली सुरू झालेली बिनदिक्कत समाजसेवा रस्ते बांधकाम आणि विविध योजनांच्या अपहारापर्यंत दिसून आली. विविध प्रकारचे उपक्रम राबवित पोलादपूरवासियांची फसवणूक करणार्‍यांना मोठया प्रमाणात मतदान होत असल्याची कपाळाला हात मारून चर्चा सुरू झाल्यानंतर ’म्होरल्या वरशाला बगू!’ एवढाच निर्धार व्यक्त होत आहे.

-शैलेश पालकर

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply