बहुमतासाठीचा 272 जागांचा पल्ला एनडीए पार करील असे यापैकी बहुसंख्य चाचण्यांमधून सुचवण्यात आले आहे. निवडणुकांच्या निकालांनंतर दिल्लीत अस्थिरता निर्माण होईल असे गृहित धरून चंद्राबाबू नायडूंनी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने नुकत्याच शरद पवार, राहुल गांधी यांच्या भेटी घेतल्या आहेत. मायावती, अखिलेश यादव यांनाही ते भेटले. परंतु भाजपप्रणित एनडीएला 275 ते 300च्या आसपास तर काँग्रेसप्रणित युपीएला 125 ते 130 इतपतच जागा मिळतील असा सूर बहुतेक चाचण्यांच्या निकालांमधून दिसतो.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. या मतदानाची अखेर होताच, रविवारी सायंकाळी एका पाठोपाठ एक अनेक मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्यात आले. विविध वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे वा तत्सम संस्थांनी या चाचण्या घेतल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीस बहुमत मिळणार नाही असा काहिसा सूर आधी काही निवडक राजकीय पंडित लावत होते. परंतु रविवारी संध्याकाळी जाहीर झालेल्या सर्व मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांमधून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच (एनडीए) पुन्हा सत्तेवर विराजमान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. छोट्या पक्षांना जेमतेम 100च्या आसपास जागा दाखवण्यात आल्या आहेत. निरनिराळ्या चाचण्यांनी वर्तवलेल्या अंदाजांमध्ये जागांच्या संख्येत तफावत दिसत असली तरी एनडीएच निवडणुकीत बाजी मारेल असा स्पष्ट निर्देश सर्व अंदाजांतून दिसला आहे. या अशा मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यामध्ये यापूर्वी बरीच तफावत दिसली असली तरी दिवसेंदिवस या चाचण्या अधिकाधिक उत्तम होत चालल्या आहेत हेही तितकेच खरे. अर्थात जेतेपद कुणाकडे जाते हे गुरुवारी स्पष्ट होईलच. त्याआधी निष्कर्ष काढण्याची घाई न करता निकाल येईपर्यंत थांबणेच सर्वार्थाने इष्ट ठरते. परंतु निव्वळ या मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांपुरते बोलायचे ठरले तर यात मात्र पुन्हा मोदी यांचेच सरकार येणार हे जवळपास स्पष्ट दिसते आहे. शंका असलीच तर एवढीच की, भाजपला लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळेल की एनडीएतील मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल? हे चित्र गुरूवारी स्पष्ट झाले की त्यानुसार सरकारचे स्वरुपही निश्चित होईल. मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांकडे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विरोधात कुठल्याही स्वरुपाची अँटी इन्कम्बन्सी लाट नव्हती असे म्हणावेसे वाटते. भाजप स्वबळावर 300 जागा जिंकेल व तो टप्पा पक्षाने निवडणुकीच्या सहाव्या
फेरीतच पार केल्याचा आत्मविश्वास भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे. या मतदानोत्तर चाचण्यांपैकी ज्या अंदाजांमध्ये एनडीएला बहुमतापेक्षा कमी जागा दाखवण्यात आल्या आहेत तिथेही विरोधकांच्या आघाडीसाठी कोणत्याही संधीला जागा दिसत नाही. तेव्हा आता पुन्हा मोदी यांचेच सरकार सत्तेवर येणार हे जवळपास स्पष्टच दिसते आहे म्हणायला हरकत नाही. अर्थात काँग्रेस पक्षाने अद्याप आपला बालहट्ट सोडला नसून मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज त्या पक्षाने फेटाळून लावले आहेत. प्रत्येक निवडणूक अंदाजाने एनडीएच्याच विजयाकडे निर्देश केला असला तरी, येत्या 23 तारखेच्या निकालांमुळे सत्ताधारी पक्ष तसेच राजकीय वर्तुळालाही धक्का बसेल असा दावा त्या पक्षाकडून करण्यात आला आहे. आता हा धक्का नेमका कुणाला बसेल हे येत्या गुरुवारीच स्पष्ट होईल.