कर्जत ः बातमीदार
कर्जत पोलीस ठाण्यातील एका 37 वर्षीय पोलीस शिपायाला कोरोनाची लागण झाली आहे. सावळे येथील कोरोना पॉझिटिव्ह आरोपीच्या संपर्कात आल्याने पोलीस शिपायाला कोरोना झाला आहे. दरम्यान, वैजनाथ येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर पनवेलमध्ये उपचार सुरू असून कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 33वर पोहचली आहे.
सावळे गावात 25 मे रोजी दोन गटांतील हाणामारीप्रकरणी तब्बल 32 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. एका गटातील नऊ आरोपींना कर्जत पोलिसांनी अटक केली होती. अटक आरोपींना 3 जूनला सावळे येथे आणण्यात आले होते. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले होते. तळोजा जेलमध्ये नेण्यापूर्वी सर्व आरोपींची कोरोना टेस्ट करण्याचे आदेश होते. त्यानुसार तळोजाला नेण्यापूर्वी सर्वांची कोरोना टेस्ट करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यात आले. नऊपैकी 25 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, तर अन्य आठ आरोपी निगेटिव्ह आढळले. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली होती. कोठडीतील आरोपीच्या संपर्कात आलेले कर्जत पोलीस ठाणे येथील कर्मचारी आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे काय यासाठी कर्जत पोलीस ठाण्यातील आठ पोलीस कर्मचार्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्यातील 37 वर्षीय पोलीस शिपायाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह, तर अन्य सात जणांची टेस्ट निगेटिव्ह आली. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या पोलीस शिपायावर न्यायालयात आरोपींच्या हाताचे ठसे घेण्याचे काम असते. सावळे येथील कोरोना पॉझिटिव्ह तरुणाच्या संपर्कात आल्याने या पोलीस शिपायाला कोरोनाची लागण झाली. या पोलीस शिपायाबरोबर आणखी काही पोलीस कर्मचार्यांनीही सावळे येथील आरोपीचे हाताचे ठसे घेतले होते, मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.