Breaking News

वेगवान विकास

आपल्याकडे एक म्हण आहे इच्छा तिथे मार्ग. जर काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल तर मार्ग सापडतोच आणि दूर्दम्य इच्छाशक्ती असल्यावर तर काय करता येऊ शकते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या नऊ वर्षांत दाखवून दिले आहे. उत्तुंग व विधायक कार्यातून मोदी सरकारने देशाचा कायापालट केला आहे. आता राज्यातही ट्रिपल इंजिन सरकार असल्याने यापूर्वी रखडलेल्या कामांना गती मिळाली आहे.

आपल्या देशात लोकशाही अस्तित्त्वात आहे. जनता निवडणूक प्रक्रियेतून लोकप्रतिनिधी निवडून देते आणि या लोकप्रतिनिधींनी आपल्या अधिकाराचा वापर करीत जनतेला सोयीसुविधा पुरवून परिसराचा विकास साधणे अपेक्षित असते. सत्तेची चटक लागलेले काँग्रेसवाले नेमके हेच विसरले आणि स्वत:च्याच विकासात रमले. त्यामुळे देशातील सुज्ञ जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून देत 2014मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. विकास काय असतो हे पंतप्रधान मोदींनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच दाखवून दिले होते, पण ते एक राज्य होते. एवढ्या मोठ्या तेही विविधांगी असलेल्या देशाचा कारभार पाहणे सोपे काम नव्हते. शिवाय विविध घोटाळ्यांमुळे देशाची आर्थिक स्थिती खालावली होती आणि जागतिक पातळीवर प्रतिमाही मलिन झाली होती. कडक शिस्त व प्रचंड मेहनती असलेल्या नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर सर्वप्रथम लोकाभिमुख व पारदर्शक कारभारास प्राधान्य दिले. त्याचवेळी विकासकामांवर लक्ष्य केंद्रित केले. बघता बघता देशाचे रूप बदलले आणि जगभरात भारताचा गवगवा होऊ लागला. जे बडे देश भारताला हीन समजत होते तेच पायघड्या घालू लागले. हा सकारात्मक बदल मोदी सरकारने घडवून आणला. विविध योजनांद्वारे त्यांनी निरनिराळ्या घटकांना बळ दिले. त्यांच्यासाठी ठरवून दिलेला लाभ त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होऊ लागला. काँग्रेसच्या काळात अनेक घोषणा व्हायच्या, मात्र त्या जनतेपर्यंत अभावानेच पोहचायच्या आणि पोहचल्याच तर त्यातील नाममात्र रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या पदरी पडत असे. पंतप्रधान मोदींनी ही पद्धत बदलली. जे ज्याचे आहे ते त्यालाच मिळाले पाहिजे याकडे त्यांनी काटेकोरपणे लक्ष दिले. शेतकरी, सर्वसामान्य, महिला, वृद्ध अशा सगळ्यांसाठी त्यांनी योजना, निर्णय, उपक्रम राबविले. त्यांच्या याच सबका साथ सबका विकास सूत्रामुळे जनतेने त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान केले. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने ते कार्यरत आहेत. राज्यातही त्याच विचारांचे सरकार आल्याने साहजिकच विकासाला वेग आला आहे. भाजपच्या जोडीला गेल्या वर्षी शिवसेना नेते एकनाथ शिंदे आले होते. त्यानंतर अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीही साथ दिली. त्यामुळे आता तीन मजबूत पक्षांचे व नेत्यांचे सरकार राज्यात कार्यरत झाल्याने मोठ्या प्रमाणात कामे होत आहेेत. विविध प्रकल्प साकारत आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी गे लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पुण्यात येऊन गेले. त्या वेळी त्यांनी पुण्यातील दोन मेट्रो मार्गिकांना हिरवा झेंडा दाखवला. त्याचप्रमाणे गृहप्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. त्यानंतर शनिवार व रविवारी गृहमंत्री अमित शाह पुणे दौर्‍यावर होते. त्यांच्या हस्ते सहकार संस्थेने निर्माण केलेल्या पोर्टलचे लाँचिंग करण्यात आले. एकूणच केंद्र सरकारचे महाराष्ट्राकडे विशेष लक्ष असून राज्याच्या विकासात भरीव योगदान दिले जात आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply