मोहोपाडा : प्रतिनिधी
आपटा ग्रामपंचायत हद्दीतील माडभुवन ही आदिवासीवाडी डोंगराच्या पायथ्यालगत वसलेली आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर कधीही खचून खाली येऊ शकतो, म्हणून माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये आणि वन विभागाचे अधिकारी काटकर यांनी पाहणी केली. या वेळी तत्काळ निर्णय घेऊन जवळच असलेल्या गारमेंटच्या रिकाम्या इमारतीत वाडीतील सर्व ग्रामस्थांचे सुरक्षित स्थलांतर केले. यादरम्यान स्थानिक आमदार महेश बालदी यांनी स्थलांतरित ग्रामस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन वाडीचे सुरक्षित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते.
ग्रामस्थांसमवेत नवीन जागेचा शोध घेऊन आवश्यक असणार्या कागदपत्रांची पूर्तता केली आणि वरिष्ठ प्रशासनाला सादर केले. गेले पाच-सहा दिवस जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तसेच हवामान खात्याकडून कोणताही अलर्ट जारी न केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीने माडभुवन येथील स्थलांतरित ग्रामस्थांना पुन्हा आपल्या वाडीत राहत्या ठिकाणी जाण्यास सांगितले तेथे राहत असताना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने ग्रामस्थांना दिल्या तसेच यापुढे कधीही अतिवृष्टीचा धोका असेल त्यावेळेला तत्काळ सध्या स्थलांतरित केलेल्या जागेवर येण्याच्या सूचनादेखील प्रशासनाने या वेळी दिल्या त्यानुसार सर्व ग्रामस्थांना त्यांच्या राहत्या वाडीत हलविण्यात आले.
या वेळी माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, मंडळ अधिकारी तुषार काकडे, तलाठी एस. टी. तवर, ग्रामसेविका वैशाली जाधव, माजी सरपंच दत्ता पाटील, रत्नाकर घरत, राजू देशमुख ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग लेंडे, स्थलांतरित ग्रामस्थ उपस्थित होते.