Monday , February 6 2023

जोकोव्हिच-फेडरर लढतीची पुन्हा पर्वणी

सिडनी : वृत्तसंस्था
गतवर्षी झालेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या थरारक अंतिम सामन्यानंतर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हे दोन सर्वोत्तम टेनिसपटू ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. या दोन्ही नामांकित खेळांडूचा खेळ पाहणे म्हणजे जगभरातील तमाम टेनिसप्रेमींसाठी गुरुवारचा दिवस पर्वणीच ठरणार आहे. विशेष म्हणजे उभय खेळाडूंमधील हा अर्धशतकी सामना असल्याने या लढतीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
जागतिक क्रमवारीत तिसर्‍या स्थानी असलेल्या फेडररने अमेरिकेच्या टेन्निस सँडग्रेनला 6-3, 2-6, 2-6, 7-6 (10-8), 6-3 असे पाच सेटमध्ये पराभूत केले. हा सामना तीन तास आणि 31 मिनिटांपर्यंत लांबला. 20 ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररने तब्बल सात मॅच पॉइंट्स वाचवून अविश्वसनीय पुनरागमन केले. याशिवाय या लढतीत त्याला दुखापतीनेसुद्धा ग्रासले होते, परंतु या सर्व अडथळ्यांवर मात करून त्याने विजयश्री मिळवली.
गतविजेत्या दुसर्‍या मानांकित जोकोव्हिचने 32व्या मानांकित मिलोस राओनिकला 6-4, 6-3, 7-6 (7-1) असे सरळ तीन सेटमध्ये नेस्तनाबूत केले. आतापर्यंत या स्पर्धेत एकही सेट न गमावणार्‍या 32 वर्षीय जोकोव्हिचने या सामन्यातही पहिल्या गेमपासूनच आक्रमक खेळ केला. तिसर्‍या सेटअंती बरोबरी झाल्यामुळे टायब्रेकरमध्ये सेटचा निकाल लागला. टायब्रेकरमध्ये जोकोव्हिचने राओनिकला डोके वर न काढू देता 7-1ने विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले.
ग्रँडस्लॅम स्पर्धेत फेडरर-जोकोव्हिच 17व्यांदा आमनेसामने येणार आहेत. यापूर्वीच्या 16 लढतींपैकी जोकोव्हिचने 10, तर फेडररने 6 वेळा विजय मिळवला आहे. 26-23 आतापर्यंत झालेल्या 49 सामन्यांपैकी (सर्व स्पर्धा मिळून) जोकोव्हिचने 26, तर फेडररने 23 वेळा यश संपादन केले आहे. ग्रँड स्लॅम स्पर्धाचा इतिहास पाहता 2012च्या विम्बल्डनच्या अंतिम फेरीत फेडररने जोकोव्हिचला शेवटचे नमवले आहे. त्यानंतर मात्र दर वेळी जोकोव्हिचनेच फेडररवर वर्चस्व मिळवले आहे.
महिलांमध्ये बार्टी, सोफिआ उपांत्य फेरीत
ऑस्ट्रेलियाची अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी आणि अमेरिकेची 14वी मानांकित सोफिआ केनिन या दोघींनी महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. गुरुवारी पहिल्या उपांत्य सामन्यात या दोघीच एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकतील. गतवर्षी फ्रेंच टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवणार्‍या बार्टीने सातव्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाचा 7-6 (8-6), 6-2 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला, तर कारकिर्दीत प्रथमच एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणार्‍या सोफिआने ओन्स जेबूरवर 6-4, 6-4 असा विजय मिळवला.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply