Breaking News

माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात 100 टक्के सूट मिळावी

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना मालमत्ता करात 100 टक्के सूट मिळावी, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, खारघर भाजपचे कार्यकर्ते किरण पाटील, कर्नल अमरजित सिंग वाधवान, कमांडर पुरणचंद चौधरी, शिवप्रसाद थपलियाल, गाजे सिंग, माजी सैनिक विजय जगताप आदी त्यांच्यासोबत उपस्थित होते.
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत देशाच्या संरक्षणाकरिता सैनिकांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले. त्याच धर्तीवर सैनिक सेवानिवृत्त झाल्यावर त्यांना आपल्या समाजात योग्य तो सन्मान मिळावा या हेतून आपण प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नेहमीच त्यांचा गुणगौरव करीत असतो, मात्र काही माजी सैनिकांची आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा वेळी माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना राष्ट्र कर्तव्य पार पाडल्याबद्दल आपल्या पनवेल महापालिकेमार्फत आकारण्यात येणार्‍या मालमत्ता करात 100 टक्के सूट दिल्यास त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल व यशस्वीरित्या राष्ट्र कर्तव्य पार पाडल्याने त्यांना खर्‍या अर्थाने सन्मान मिळेल.
या विषयाचे महत्त्व लक्षात घेता पनवेल महापालिका क्षेत्रातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना महापालिकेमार्फत आकारण्यात येणार्‍या मालमत्ता करात 100 टक्के सूट देण्याकरिता योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, असे अधोरेखित करून माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आग्रही मागणी केली आहे.

या मागणी संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करणार आहोत तसेच खारघर, पनवेल, कळंबोली, कामोठे आदी नोडनिहाय कॅम्प लावून संख्यात्मक माहिती घेणार आहोत.
-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply