अलिबाग : प्रतिनिधी
फ्युजन ट्रॉफी टी-20 क्रिकेट स्पर्धे अभी इलेव्हन अलिबाग संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी रायगड राजे संघाचा पराभव केला.
कुरूळ येथील आरसीएफ क्रीडासंकुल येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अभी इलेव्हन आणि रायगड राजे यांच्यातील अंतिम फेरीचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. दुसर्या सुपर ओव्हरमध्ये अभी इलेव्हनने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना अभी इलेव्हनने आठ गडी गमावून 133 धावा केल्या. यामध्ये सूरज पाटील याने सर्वाधिक 56 धावा काढल्या. रायगड राजे संघा कडून आकाश पाटील आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. विजयासाठी आवश्यक असलेल्या 134 धावांचा पाठलाग करताना रायगड राजे संघाचा डावदेखील 133 धावांवर आटोपला. यात राहुल सिंगने 48 धावा केल्या, अभी इलेव्हनकडून राहुल खरातने ततीन गडी बाद केले.
सामना टाय झाल्यामुळे सुपर ओव्हर खेळविण्यात आली. तेव्हादेखील सामना टाय झाला. पुन्हा सुपर ओवर झाली. दुसर्या सुपर ओवर मध्ये अभी एलेव्हनने सामना जिंकून विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून अभी एलेव्हनचा सूरज पाटील याची निवड करण्यात आली. स्पर्धेचा मानकरी व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून रायगड राजे संघाचा मॅक्सवेल, तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून याचा संघाचा राहुल सिंग याला गौरविण्यात आले.