मुंबई ः प्रतिनिधी
महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्रांमधून काल 20 मे रोजी दुपारी एक वाजून 28 मिनिटांपर्यंत रेकॉर्डब्रेक म्हणजेच 10034 मेगावॅट इतके वीज उत्पादन घेण्यात आले. महानिर्मितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. यामध्ये औष्णिक विद्युत केंद्राचे वीज उत्पादन 7577 मेगावॅट, ज्यात नाशिक 561 मेगावॅट, कोराडी 1500 मेगावॅट, खापरखेडा 951 मेगावॅट, पारस 450 मेगावॅट, चंद्रपूर 2550 मेगावॅट, भुसावळ 967 मेगावॅट, तर उरण वायू विद्युत केंद्र 270 मेगावॅट, सौरऊर्जा 119 मेगावॅट व जल विद्युत केंद्रांपासून 2100 मेगावॅट वीज उत्पादन घेण्यात आले. राज्यात सर्वदूर कडक उन्हाळा असून विजेची एकूण मागणी 22300 मेगावॅटपर्यंत पोहचली असून राज्याचे वीज उत्पादन 17337 मेगावॅट (खासगी वीज उत्पादनासह) इतके आहे. सुमारे 5357 मेगावॅट वीज केंद्राच्या वाट्यातून घेण्यात येत आहे. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी संचालक व महानिर्मितीच्या औष्णिक, वायू, सौर व जल विद्युत केंद्रातील सर्व संबंधित मुख्य अभियंते व त्याअंतर्गत कार्यरत अधिकारी, विभागप्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांची ही फलश्रुती असल्याचे चंद्रकांत थोटवे यांनी सांगितले. 10034 मेगावॅटच्या ऐतिहासिक रेकॉर्डब्रेक वीज उत्पादनाबद्दल सर्व संबंधित कुशल मनुष्यबळाचे चंद्रकांत थोटवे यांनी अभिनंदन केले आहे.