नवी मुंबई ः प्रतिनिधी
रात्रीच्या अंधारात ग्राहकांना प्रामुख्याने आपला व्यवसाय दिसावा म्हणून पदपथावर असणार्या वृक्षांवर संबंधित व्यावसायिक विद्युत दिवे लावत असल्याच्या घटना नवी मुंबईत नेहमीच पाहावयास मिळतात. अशाच प्रकारे चक्क वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील आवारात असणार्या हॉटेलचालकाने तिथे असणार्या वृक्षावर विद्युत माळ लावून वृक्षसंरक्षण कायद्याचा भंग केला असून, संबंधित हॉटेलचालकावर कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्रेमी करीत आहेत.
वाशी सेक्टर 30मध्ये सिडकोचे प्रदर्शन केंद्र आहे. या ठिकाणी प्रदर्शन केंद्रासमोर एका हॉटेलचालकाने आपला व्यवसाय दिसावा म्हणून हॉटेलसमोर असणार्या वृक्षावर रंगीबेरंगी विद्युत दिव्यांची माळ लावली आहे. या विद्युत माळेमुळे वृक्षांची हानी होत असताना मनपा उद्यान विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.
वृक्षावर विद्युत दिवे पेटवणे हा वृक्षसंरक्षण अधिनियम 21(1)प्रमाणे गुन्हा आहे. याविरोधात मनपा वृक्ष प्राधिकरणाकडून उचित कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित हॉटेलचालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.