Breaking News

आंदोलन चिघळवू नये

राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना या आरक्षणासाठीचे आंदोलन चिघळल्यास त्यातून कुणाचे भले होणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत 24 तारखेला संपली, मात्र त्याआधीच राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये राजकीय नेत्यांना या प्रश्नी गावबंदी करण्यात आली असून या सार्‍यातून गटागटांमध्ये वाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वास्तविक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांना साक्ष ठेवून मराठा आरक्षण देण्यास आपण कटिबद्ध असल्याची भूमिका जाहीर केली होती, परंतु तरीदेखील जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारपासून पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरूवात केली. दुसर्‍या दिवशी त्यांनी वैद्यकीय तपासणीसदेखील नकार दिला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी दुपारी तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने ते मराठा आरक्षणासोबतच मंत्रिमंडळ विस्तार, अपात्रता सुनावणी आदी विविध मुद्यांवर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करतील असे सांगितले जात होते. मराठा आरक्षणाच्या पेचामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची चर्चाही गुरुवारी सुरू झाली. दरम्यान, आजवर शांततापूर्ण आंदोलन म्हणून नावाजले गेलेले मराठा आरक्षण आंदोलन यापुढे वेगळे वळण घेईल की काय अशी चिंता आता व्यक्त होऊ लागली आहे. अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचे फलक लागले आहेत. काही राजकीय नेत्यांनी याविषयी नाराजी व्यक्त केली असून यातून निरनिराळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची भीती आहे. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून वातावरण तापलेले असतानाच आत्महत्यांचे सत्रही सुरूच दिसते आहे. मराठवाड्यातील आणखी दोन तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची माहिती गुरूवारी समोर आली. वास्तविक सरकार मराठा आरक्षणासाठी पूर्णपणे सकारात्मक असून कोणीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. तरीही तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नका, कुणीही उग्र आंदोलन करू नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनीही बुधवारी केले. प्रत्यक्षात मात्र मराठा आंदोलनातील तरुण आक्रमक झाल्याचे दिसून आले. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी थेट प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची प्रचंड मोडतोड केली. या वेळी त्यांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणाही दिल्या. पोलिसांनी या तीनही तरुणांना अटक केली आहे. आंदोलनाला हे काहीसे हिंसक वळण लागलेले असतानाच विरोधकांनी मात्र आगीत तेल ओतण्याचे आपले काम सुरूच ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात आलेले असताना, त्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्यासारख्या दीर्घ राजकीय कारकीर्द असलेल्या नेत्याने करावी याला काय म्हणावे! मराठा आरक्षणाबद्दल राज्यातील सरकार पूर्णत: अनुकूल आहे. न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळावे याकरिता सर्वतोपरि काळजी घेऊन तोडगा काढण्याच्या प्रामाणिक प्रयत्नात राज्यातील सरकार असताना आरक्षणासाठीचे हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न कुणीही करता कामा नये.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply