पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल व खालापूर तालुक्यातील आदिवासी समाजाचे वन हक्काचे दावे आणि मूलभूत सोयीसुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली.
या बैठकीला विविध वाड्यांमधील आदिवासी समाजाचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आदिवासींचे विविध प्रश्न आमदार महेश बालदी यांनी वनमंत्र्यांसमोर मांडले. यापैकी घेरावाडीचा प्रश्न गेली 22 वर्षे रेंगाळत आहे. आजही या वाडीला रस्ता, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधादेखील नाहीत. त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी पुनर्मागणी यावेळी आमदार महेश बालदी यांनी केली.
या प्रश्नावर मंत्रीमहोदयांनी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत तत्काळ येथील ग्रामस्थांना रस्ता, वीज, पाणी यासारख्या मूलभूत उपलब्ध करून देण्याच्या सूचना उपस्थित अधिकार्यांना दिल्या. या वेळी उपस्थित भरत वाघे यांनी कर्नाळा, आपटा आणि गुळसुंदे ग्रामपंचायत अंतर्गत गेली अनेक वर्षे आम्ही वनजमीन कसत आले आहोत. याच जमिनीवर भाजीपाला आणि फळझाडे लागवड करून आमची उपजीविका चालवतो. या जमिनीचे वन हक्काचे दावे दाखल केले असून त्यास मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती केली. त्यास मंत्रीमहोदयांनी हे सर्व अधिकार जिल्हाधिकार्यांना दिले असून वस्तुस्थितीची संयुक्त पाहणी करून प्रश्न मार्गी लावावा अशा सूचना संबधित अधिकार्यांना देण्यात आल्या. याचबरोबर खालापूर तालुका भाजपचे अध्यक्ष प्रवीण मोरे यांनी हशाचीवाडी, ताडपट्टीवाडी यांचा रस्त्याचा तसेच दरडग्रस्त वाड्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर मदत व पुनर्वसन मंत्रालयास संपूर्ण अधिकार दिले आहेत. अशा धोकादायक दरडग्रस्त वाड्यांचे त्वरित सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्रीमहोदयांनी संबधित अधिकार्यांना दिले. याशिवाय कर्नाळा अभयारण्याच्या सुशोभिकरणासाठी विविध कामांना या वेळी मंजुरी देण्यात आली, जेणेकरून पर्यटन व्यवसाय वाढीस लागेल आणि रोजगार निर्मिती होईल.
या बैठकीस पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, युवा कार्यकर्ते मंगेश वाकडीकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, कर्नाळा आरएफओ राठोड, कराडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजय मिरकुटे, किरण माळी, सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत आणि विविध विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Check Also
खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त
पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …