



एप्रिल ते जून महिन्यात जेष्ठ नागरिकांना त्रास दिल्याच्या तक्रारीचे प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आज घरात वृध्द माणूस म्हणजे अडचण वाटू लागले आहेत. परदेशात राहणार्या मुलांना आपल्या आई-वडिलांचा घरात मृत्यू झाल्याचे अनेक महिने माहीत नसल्याच्या किंवा त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याने व्हॉट्सअपवर दाखवा सांगणार्या आजच्या तरूणांच्या बातम्या आपण वाचत असतो. अशा वेळी वृद्ध माणसे ही घरातील अडचण नाहीत. त्यांना समजून घ्या असा संदेश देण्यासाठी नऊ वर्षे संजय दातार आनंदोत्सव साजरा करीत आहेत. त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
पनवेल-रसायनी रस्त्यावर असलेल्या कसालखंड येथील दातार इन्स्टिट्यूटमध्ये वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी संजय दातार हे नऊ वर्षे आनंदोत्सव साजरा करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील जांभूळपाडा, पेण, पनवेल, नेरे व नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील वृद्धाश्रमातील 300 पेक्षा जास्त आजी-आजोबा यामध्ये सहभागी होतात. मराठी पध्दतीने दिवा ओवाळून प्रत्येकाचे स्वागत करण्यात येते निरनिराळे खेळ, गाणी, नृत्य व ड्रामा असे भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात येतात. यावेळी ’ ओ, मेरी जोहरा जबिन’ म्हणत नर्मदा निकेतनच्या ठक्कर आजोबांचे नृत्य पाहून सत्तरी पूर्ण केलेल्या आजींनीही ताल धरल्याचे पाहून अनेक आजी-आजोबांचे हृदय धडकू लागले असेल आणि त्यांच्या तारुण्यातील आठवणी जागृत झाल्याचे दिसून येत होते. ’कोई लौटा दे मुझे मेरे बिते हुए दिन’ असेच त्यांना वाटले असेल. या वेळी त्यांच्या चेहर्यावरील आनंद पाहून मला समाधान मिळते असे संजय दातार सांगतात. चहा, नाष्टा व जेवणाचे वेळी आग्रह करून वाढणारे आणि प्रत्येकाची चौकशी करणारे संजय दातार , प्रशांत नायर, चेतना अभ्यंकर व त्यांचे सहकारी पाहून या ज्येष्ठांचे डोळे पाणावतात
शेकडो आजी-आजोबांच्या आनंदासाठी दरवर्षी कार्यक्रम करणारे संजय दातार आणि त्यांचा परिवार यांचे कौतुक करीत असतानाच समाजातील दुसरी बाजू ही प्रकर्षाने समोर येत आहे. एप्रिल ते जून महिन्यात जेष्ठ नागरिकांना त्रास दिल्याच्या तक्रारीचे प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मातृ दिन, पित्रु दिन साजरा करून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून त्यांच्याबद्दल बेगडी प्रेम दाखवणारे आपल्या आई-वडिलांना घरातील एक अडचण समजत असून एक तर त्यांना वृध्दाश्रमाचा रस्ता दाखवतात नाहीतर त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये गरीब, श्रीमंत किवा उच्च शिक्षित असा भेदभाव नाही सगळीकडे सारखेच असते.
श्रीमंत असो वा गरीब आई शेवटी आईच असते मुलगा किती ही मोठा झाला तरी तिला तो लहानच असतो. आपले किती ही हाल झाले तरी ती मुलाची काळजी करीत असते. याचे उदाहरण म्हणजे नवी मुंबईत राहणार्या एका मध्यमवयीन महिलेने आपल्या पतीच्या निधना नंतर लोकांची भांडी घासून मुलाला मोठे केले पण त्याला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे नोकरी नाही आईच्या पैशावर जगताना मुलगा आईला काम करून आल्यावर रात्री एक तास ही झोपू देत नाही. आई आजारी आहे तरी रात्री घरी आल्यावर तिला मारतो, मोठयाने आवाज करीत राहतो. प्रसंगी नशेत आई जवळ अश्लील वर्तन करण्याचा ही प्रयत्न करतो. आई रडत तक्रार करते. पण आपण त्याला सोडून गेलो तर त्याला खायला कोण घालेल म्हणून त्याला सोडून जायला ही तयार नाही. आपल्या मुलाच्या काळजीने त्याच्या सगळ्या चुका ही ती माफ करतांना दिसते .
ज्यांनी या जगात आणले, वाढविले त्या वडिलांनाच फसवल्याची हृदयद्रावक घटना नगर जिल्ह्यात समोर आली आहे.’ तुमच्या डोळ्याचे ऑपरेशन करायचे आहे, त्यासाठी सप्तशृंगगडावर जायचे आहे’, असे सांगून राहुरी तालुक्यातील एका मुलाने आपल्या वृद्ध पित्याला सप्तशृंगगडावर आणले आणि त्याना गडाच्या पहिल्या पायरीजवळच बसण्यास सांगून स्वत: तेथून पोबारा केला.हा धक्कादायक प्रकार मंदिराच्या सुरक्षा कर्मचार्यामुळे उघडकीस आला. या दुर्दैवी पित्यास सध्या गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका वृध्दाश्रमात ठेवण्यात आले आहे. स्वत:च्या दृष्टिहीन जन्मदात्या पित्याला दीडशे किमी दूर नेऊन त्याला एकटेच निराधारपणे सोडून त्याचा पोटचा मुलगा पलायन करतो, यावर वरवर विश्वास बसत नसला, तरी हे सत्य आहे.
सप्तशृंगगडाच्या पहिल्या पायरीवर दुपारी साधारण 3 वाजता नेहमीप्रमाणे भाविकांची गर्दी असताना त्याच गर्दीच्या घोळक्यात मळकट-फाटके कपडे नेसलेले, अंगाने बारीक, विस्कटलेले केस अशा वर्णनाचे एक दृष्टिहीन वयोवृद्ध डोळ्यांतून आसवे गाळत बसलेले होते. दिवसभर त्यांच्याकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नव्हते. रात्री दहाच्या सुमारास गर्दी कमी झाल्यानंतर हा वृध्द तेथे तशाच अवस्थेत बसून असल्याचे सुरक्षा कर्मचारी पंडित कळमकर यांना दिसले.त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्या वयोवृद्धाने आपले नाव किसन कपालेश्वर वायाळ (वय 65, म्हेसगाव, नगर) असल्याचे सांगितले. ’माझ्या मुलाने मला माझ्या डोळ्यांचे ऑपरेशन करायचे आहे, असे खोटे सांगून येथे आणले. आणि मी परत येईपर्यंत कुठेही न जाण्यास सांगितले.सायंकाळी 4 ते 5 वाजेपासून तो परतलाच नाही. सुनबाईच्या कटकटीला कंटाळून आपला मुलगा येथे मला एकट्याला सोडून निघून गेला’ अशी माहिती किसन यांनी सांगितली.
त्यानंतर कळमकर यांनी मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांना याबाबत माहिती दिली. दहातोंडे यांनी रात्री 10 वाजेच्या सुमारास राहुरी पोलीस ठाण्यात दूरध्वनी करून घडलेला प्रकार सांगितला.संबंधित मुलगा आपले वडील हरविल्याची कदाचित खोटी तक्रार दाखल करेल, असे सांगून त्याला ताब्यात घेण्याची विनंती दहातोंडे यांनी पोलिसांना केली.त्यानंतर दहातोंडे, कळमकर, ज्ञानेश्वर सदगीर, इम्रान शाह, संतोष पाटील, पोलीस कर्मचारी ब्राह्मणे यांनी वायाळ यांना घेऊन नांदुरी येथील सप्तशृंगी वृद्धाश्रम गाठले. वृद्धाश्रमाचे अध्यक्ष गंगा पगार यांना सर्व हकीकत सांगून किसन यांना त्यांच्या स्वाधीन केले.
आणखी एका केसमध्ये पती-पत्नी उच्च शिक्षित चांगल्या हुद्दयावर नोकरी करणारे. लग्न झाल्यावर सासू जवळ न पटल्याने वेगळा संसार थाटला होता. आई 76 वर्षाची झाल्यावर नवर्याने तिला घरी आणले हे पत्नीला आवडले नाही. सासू हॉल मध्ये बसते म्हणून त्याठिकाणी कपड्याचा ढीग टाकून तिला बसता येणार नाही अशी व्यवस्था केली. पतीने आपला 3 बेडरूमचा ब्लॉक असल्याने एका बेडरूम मध्ये आईची सोय केली त्याचा राग येऊन पत्नी वेगळी रहायला गेली. आईमुळे पती आपल्याला कमी वेळ देतो सांगत ही महिला आता पतीकडून पोटगीची रक्कम घेऊन वेगळी राहते .
एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने म्हणजे सुट्टीची मजा घेण्याचे महीने याच कालावधीत मदर्स डे म्हणजे मातृ दिन ही आपण 12 मे ला साजरा करतो आई बरोबर सेल्फी काढून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकतो. आपले आईवर किती प्रेम आहे हे मित्रांना दाखवण्याचे नाटक करतो असेच म्हणावे लागेल. कारण याच तीन महिन्यात जेष्ठ नागरिकांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याची धक्कादायक माहिती सी.बी.डी. पोलिस ठाण्यातील महिला व मुलांकरिता असलेल्या सहाय्यक कक्षातील सोशल वर्कर आसावरी जाधव यांचेकडून मिळाली. यावेळी त्यांनी उच्चशिक्षित आणि उच्च वर्गीय महिला आणि पुरुष ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक आणि मानसिक त्रास देताना अश्लील बोलतातच पण त्यांच्या खाजगी भागाला काठीने टोचण्या पर्यंत त्यांची मजल जातअसल्याचे सांगितले. आई -वडिलांवरून वरुन वाद झाल्यास तरूण पिढी विभक्त होण्याची टोकाची भूमिका ही घेताना दिसत आहेत. यावरून मदर्स डे हा सेल्फी काढून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यापुरताच असतो हे लक्षात येते. त्यामुळे आजची तरुण पिढी कोठे चालली आहे असा प्रश्न पडत आहे.
एप्रिल महिना सुरू झाला की सगळ्यांना सुट्टीचे आणि फिरायला जाण्याचे वेध लागतात. आपल्या सहलीचे बेत ठरवताना घरातील ज्येष्ठ नागरिकांची तरूण पिढीला अडचण वाटायला लागते. त्यामुळे त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देण्याच्या घटना घडत असाव्यात असे सोशल वर्कर असणार्या आसावरी जाधव यांना वाटते. अशा वेळी त्यांची वृध्दाश्रमात सोय करणे आर्थिक दृष्ट्या शक्य असताना ही नवी मुंबई आणि पनवेल महापालिका हद्दीतील उच्च शिक्षित भागात असे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले या दीड महिन्याचे कालावधीत आतापर्यंत सात ते आठ अशा प्रकारच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्याची माहिती त्यांनी दिली.
-नितीन देशमुख, खबरबात