सर्वात उशिरा झाला प्रवास सुरु
कर्जत : बातमीदार
मावळ लोकसभा मतदारसंघांतील कर्जत विधानसभा मतदारसंघात 67.76 टक्के मतदान झाले आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे मंगळवारी (दि. 30) सकाळी साडेसात वाजता पुणे येथे बालवाडी येथे जाण्यास निघाली.दरम्यान, सर्वात उशिरा कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या मतपेट्या बालेवाडी येथे पोहचल्या आहेत.
पाच ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने कर्जत मतदारसंघात वेळेवर मतदानाचे काम पूर्ण झाले नाही. वरई येथे दुपारनंतर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत थांबावे लागले. तर सालवड येथील ईव्हीएम मशीनदेखील दीड तास बंद राहिल्याने या दोन ठिकाणी तसेच नेरळजवळील वंजारपाडा येथील मतदान केंद्रातील मतदान यंत्रणा मंदगतीने सुरू असल्याने सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघात असलेली 343 मतदान यंत्रे, चांदई येथे असलेल्या स्ट्राँगरूममध्ये पोहचण्यास उशीर झाला.
या सर्व प्रकारामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघातील सर्व मतपेट्या पुणे येथील बालेवाडी स्टेडियममध्ये जाण्यासाठी उशिरा निघाल्या. निवडणूक आयोगाच्या जाहीर कार्यक्रमानुसार सोमवारी सायंकाळी 6 वाजता मतदान संपले. त्यामुळे रात्री उशिरा मतदान यंत्रे मतमोजणी होणार असलेल्या स्ट्राँगरूममध्ये पोहचणे अपेक्षित होते. पण कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या सर्व 343 मतदान केंद्रातील मतदान यंत्रे ही मंगळवारी सकाळी साडेसात वाजता चांदई येथून पोलीस बंदोबस्तात बालेवाडीकडे जाण्यास निघाली.
कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही सर्व मतदान यंत्रे पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि कर्जत, खोपोली, खालापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्या देखरेखीखाली बालेवाडीकडे निघाली होती. त्या ताफ्यात कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी, खालापूरचे तहसीलदार इरेश चपळवार आणि सर्व प्रमुख अधिकारी हे होते.