सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती
सातारा : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार्या गीतगंधाली या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात शनिवारी (दि.25) सायंकाळी करण्यात आले होते. संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुरस्कृत केलेल्या या कार्यक्रमात संभाजी पाटील व सहकार्यांनी आपली कला सादर केली.
कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ.अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर, केबीपी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी. शिर्के तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी संभाजी पाटील व वाद्यवृंदाने कर्मवीर अण्णांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना व सामाजिक योगदान संगीताद्वारे मांडले. संस्थेच्या विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांनीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.
कर्मवीर अण्णांच्या जीवनपटावरील कार्यक्रम जास्तीत जास्त आयोजित केले जातील, असे या कार्यक्रमाची सांगता करताना संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा.डॉ.ज्ञानदेव मस्के यांनी केले. अण्णांच्या कारकिर्दीचा वेध घेणार्या या संगीतमय कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.