Breaking News

‘दिबां’ची चळवळ पुढे नेऊया

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जासईत प्रतिपादन

उरण, नवी मुंबई : प्रतिनिधी, वार्ताहर
केवळ रायगड, ठाणेच नव्हे; तर संपूर्ण राज्यातील स्थानिक जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दि.बा.पाटील हे असामान्य नेतृत्व होते. एक चालती बोलती चळवळ असणारे ‘दिबां’चे विचार नव्या पिढीचे अस्तित्व टिकविण्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरणार असून यापुढेही स्थानिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण सर्वांनी ‘दिबां’नी उभारलेली चळवळ पुढे नेऊया, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 13) जासई येथे केले. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पुढाकाराने आयोजित दि.बा.पाटील चळवळ या विषयावरील द्वितीय चरणातील स्पर्धेच्या विजेत्यांचा गुणगौरव व स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळा-महाविद्यालयांतील समर्पित शिक्षकांचा सन्मान सोहळा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दिबां’चे जन्मगाव जासई येथे झाला. त्या वेळी ते बोलत होते. लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून जासई येथील मंगल कार्यालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, सुरेश पाटील, भूषण पाटील, ’दिबां’चे पुत्र अतुल पाटील, आयोजक दशरथ भगत, संदीप भगत, सरपंच संतोष घरत, उपसरपंच माई पाटील, राजेश गायकर, विनोद म्हात्रे, सीमा घरत, वैजयंती भगत, फशीताई भगत आदींसह नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष दशरथ भगत यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा कौतुकास्पद असल्याचे सांगून समाजाच्या हितासाठी आपण सर्वांनी ‘दिबां’सारखे लढवय्येपणे उभे राहिले पाहिजे, असे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले. दि.बा.पाटील यांनी सुरू केलेली स्थानिकांच्या न्याय्य हक्कांची ही लढाई चालू राहण्यासाठी त्यांचे विचार नव्या पिढीत रूजविले पाहिजेत. त्यांची ही चळवळ पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उद्गार स्पर्धेचे आयोजक तथा नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी काढले. इतर मान्यवरांनीही विचार मांडले. या वेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply