Breaking News

गेल्या 10 वर्षांत भारत बदलला -पंतप्रधान नरेंद्र मोदी

अटल सेतूचे लोकार्पण, उरण रेल्वेसेवेला हिरवा झेंडा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
महत्त्वाकांक्षी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) झाले. यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रांगणात आयोजित भव्य कार्यक्रमात बोलताना त्यांनी सुमारे दीड लाखाहून अधिकच्या संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले. गेल्या 10 वर्षांत भारत बदलला आहे. बदलत्या भारताचा फोटो स्वच्छ होतो, जेव्हा 10 वर्षांच्या आधीचा भारत आठवतो. पूर्वी हजारो, लाखो रुपयांच्या महाघोटाळ्यांची चर्चा असायची. आता हजारो, कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प पूर्ण झाल्याच्या चर्चा असतात. सुशासनाचा हा संकल्प देशभर दिसत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी या वेळी केले.
या सोहळ्यास व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व कपिल पाटील, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, मंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जपानचे राजदूत हिरोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सभास्थळी पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी लाभार्थी कुटुंबियांना प्रातिनिधिक स्वरूपात योजनेतील लाभाच्या पहिल्या हप्त्याचे धनादेश प्रदान करण्यात आले. त्याचप्रमाणे विविध प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन, पायाभरणी करण्यात आली. यामध्ये उरण-खारकोपर लोकलसेवेचाही समावेश होता.
पंतप्रधान मोदी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, 2014मध्ये माझ्यावर निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती. त्याआधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ मी काही क्षण बसलो. या गोष्टीला 10 वर्षे झाली. या 10 वर्षांत आपल्या स्वप्नांना सत्य होताना पाहिलंय. अटल सेतू या भावनांचे प्रतिबिंब आहे. तरुणांना नव्या विश्वात घेऊन आलो आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा रस्ता अटल सेतूसारख्या रस्त्यांवरून जातो. अटल सेतू हा विकसित भारताची झलक आहे. विकसित भारतात गती, प्रगती होईल. अंतर कमी होईल. देशाचा कानाकोपरा जोडला जाईल. निरंतर आणि अडथळ्यांविना सर्व सुरळीत राहिल.
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल की, अटल सेतू हा त्यांच्या नावाप्रमाणेच अटल आहे. या पुलाला माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव असणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकार्पण ही या पुलाच्या बळकटीची खात्री देणारी आहे. हा पूल 22 किमी मार्गाचा आहे. भूकंपाचे धक्केही हा पूल सहन करू शकतो, मात्र येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भूकंपाचे झटके विरोधकांना बसणार आहेत. शिवडी-न्हावा शेवा हा विजयाकडे घेऊन जाणारा महामार्ग आहे. अन्याय आणि अत्याचाराचा अंत करण्यासाठी प्रभू रामाच्या सेनेने समुद्र सेतू बांधला होता. हा सागरी सेतूही अहंकारी लोकांचा अहंकार मोडणारा ठरेल यात शंका नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला सर्वांत जास्त आनंद आहे की, अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. याचे भूमिपूजनही त्यांनी केले होते. या देशात मोदीराज आले म्हणून अटल सेतू पूर्ण होऊ शकला. अटल सेतूची संकल्पना 1973मध्ये मांडली गेली होती. 1982मध्ये जेआरडी टाटा कमिटीने अलाईन्टमेंट केली, पण 40 वर्षांत काहीच झाले नाही. मोदी पंतप्रधान बनले तसा देशाचा मिजास बदलला, काम करण्याची पद्धती बदलल्या आणि मग अनेक गोष्टी वेगाने चालू लागल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपले विचार मांडत मोदी सरकारच्या पाठबळाने राज्यातील महायुती सरकार पुढे जात असल्याचे नमूद केले.
उरण-खारकोपर लोकलसेवेचा शुभारंभ
उरणकरांचे स्वप्न असलेल्या उरण ते नवी मुंबई मार्गावरील खारकोपर-उरण या दुसर्‍या टप्प्यातील लोकलसेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल सेतू लोकार्पण सोहळ्यातून दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. यातील पहिल्या टप्प्यात नेरूळ/बेलापूर ते खारकोपर अशा 12.5 किमी अंतरापर्यंत सेवा सुरू होती. या सोहळ्यात उर्वरित उरणपर्यंतच्या 14.3 किमी लांबीच्या दुसर्‍या टप्प्यातील सेवेचा प्रारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरण-खारकोपर मार्गावरील प्रवासी वाहतुकीला हिरवा झेंडा दाखवला.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply