मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही याची काळजी घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आणि अन्य सर्व समाजांचाही विचार केला जाईल याची खात्री बाळगावी, असा शब्द मुख्यमंत्र्यांनीही दिला आहे. राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारच्या सकारात्मकतेमुळेच या प्रश्नी तापलेले वातावरण निवळेल असा भरवसा वाटतो आहे.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे गेले चार-सहा महिने राज्याचे राजकारणच नव्हे; तर समाजकारणही ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन पावले पुढे जात हा तिढा सोडवून दिलेला शब्द पूर्ण केला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी सरकारने अधिसूचना जारी केल्यानंतर नवी मुंबईतील वाशीपर्यंत आणलेला मोर्चा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी परत नेला. हे वादळ तूर्त शमले असे वाटत असतानाच ओबीसी आरक्षणाच्या मागणीचे नवे वादळ उभे राहू पाहात आहे असे दिसते. एका अर्थी ओबीसी समाजाची ही प्रतिक्रिया समजून घेण्याजोगीच वाटते. मराठा समाजाला कुणबी म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र देण्याची तरतूद नव्या अधिसूचनेत आहे. यामुळे राज्यात मोठ्या संख्येने असणार्या ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी परखड भूमिका घेऊन मंत्रिमंडळातच काहीशी चलबिचल निर्माण केली आहे हे खरे. आपल्याच सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा आणि त्याचवेळी रस्त्यावरही उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिल्यामुळे सत्ताधारी महायुतीमध्ये कुजबूज सुरू झाली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. तथापि, ओबीसी समाजाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही. भारतीय जनता पक्ष सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ओबीसी बांधवांनी त्यांच्यावर भरवसा ठेवायला हवा. फडणवीस यांचे सारेच राजकारण ओबीसी समाजाचे हित जपणारे होते व आहे. त्यामुळेच यापूर्वीच त्यांना ‘ओबीसी मित्र’ हा पुरस्कार जाहीररित्या प्रदान करण्यात आला आहे हे कुणीही विसरू नये. याशिवाय मुख्यमंत्र्यांनीदेखील सर्वांनाच दिलासा दिला आहे. भुजबळ यांनी घेतलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक असून त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंध नाही असा खुलासा मध्यंतरी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. मराठा समाजाच्या लढ्याला मिळालेले यश हे वास्तविक यश नाहीच असा दावा काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनीच केला होता. मराठा समाजाचा विशाल मोर्चा नवी मुंबईपर्यंत येऊन गेला. त्यानंतर ओबीसी समाजानेही मुंबईपर्यंत धडक मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. या मोर्चाचा मार्ग ठरवण्यासाठी आणि नियोजन करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय 20 फेब्रुवारी रोजी नगर येथे ओबीसींची विशाल सभा घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. एकंदरीत आरक्षणाचा प्रश्न राज्यामध्ये पुन्हा तापू लागणार की काय असे वाटू लागले आहे. तथापि, सत्तेवर असलेले शिंदे-फडणवीस-पवार सरकार सकारात्मक असून ढवळून निघालेले समाजकारण शांत होईल याची खात्री वाटते, कारण या सरकारवर जनतेचा खरा भरवसा आहे. भरवशाचे सरकार सत्तेत असल्यामुळेच या मागण्या होत आहेत हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे.