Breaking News

पनवेल परिसरात अपघात वाढले

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरातील खारघर आणि आजिवली या ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पहिल्या घटनेत खोदकामामध्ये केबल टाकण्याचे काम करणार्‍या एका मजुराचा क्रेनच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये घडली. खारघर पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या क्रेन ऑपरेटरविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे. या घटनेतील मृत मजुराचे नाव सुनील नरसिंमा तांगडी (वय 20) असून तो त्याचा मामा निलप्पा कवाली याच्या सोबत टेक्नोप्लस कंपनीच्या वतीने खारघरमध्ये रोडलगत खोदकामामध्ये केबल टाकण्याचे काम करत होता. दरम्यान, सुनील हा मामासोबत कामावर गेला होता. त्यानंतर तो व इतर कामगार हे खारघर सेक्टर 21 मधील ग्राम विकास भवन समोरील रस्त्यावर खोदकामामध्ये केबल टाकण्याचे काम करत होते. सकाळच्या सुमारास खोदकामामध्ये केबल टाकण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने केबल ड्रम आणण्यात येत होते. या वेळी सुनीलला केबल ड्रमचा धक्का लागल्याने तो क्रेनच्या चाकाजवळ पडला. त्यामुळे चाक त्याच्या कमरेवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दुसर्‍या घटनेत अज्ञात वाहनाच्या धडकेत 31 वर्षीय कुलभूषण कुमार याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश येथील कुलभूषण कुमार हा एबीएस हॉटेलसमोर, अजिवली येथून जात होता. या वेळी अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. यात कुलभूषण जखमी झाला. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, वाहतूक नियम न पाळणे हे अपघात होण्याचे प्रमुख कारण आहे. सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर केला जात नाही, परंतु नियम न पाळणे धोकादायक आहे. सीटबेल्ट आणि हेल्मेटमुळे अपघात झाल्यास जखमी, मृत्यू होण्यापासून वाचवता येऊ शकते. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे. 80 टक्के अपघात चालकांच्या चुकीमुळे होतात. चालकांनी गाडी व्यवस्थित चालविली तर अपघात टाळता येऊ शकतात. कित्येक वेळा पुरेशी विश्रांती न घेता वाहन चालविले जाते. वेगमर्यादेचे उल्लंघन केले जाते. ते टाळले पाहिजे. पादचार्‍यांनी झेब्रा क्रॉसिंगचा नियम पाळला पाहिजे.

‘वाहतूकीचे नियम पाळा’
रस्ते अपघातांमधे होणार्‍या मृत्यूमध्ये 18 ते 45 वयोगटातील तरूणांचा समावेश जास्त आहे. वाहन चालवित असताना तरुणांनी नियमांचे पालन करण्याबरोबरच आपल्या जबाबदार्‍या लक्षात घ्यायला हव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून जनजागृती
लोकांपर्यंत रस्ता सुरक्षेचे महत्त्व पोहोचविणासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत आहे. रस्ता सुरक्षेबाबत आवश्यक ती जनजागृती होत नाही. वाहतूक नियम लक्षपूर्वक पाळले जात नाहीत. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होतात. कित्येक जणांचा बळी जातो, काही जण जखमी होतात. ते अपघात रोखण्यासाठी, रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येतो.

 

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply