नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील क्रिकेटच्या चाहत्यांना इंग्लंडमधील वर्ल्ड कप स्पर्धा पाहता यावी, यासाठी आयसीसीने मंगळवारी प्रसारण आणि डिजिटल वितरण योजनेची घोषणा केली. यानुसार पहिल्यांदाच अफगानिस्तानमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रसारण होणार आहे. या योजनेनुसार क्रिकेट चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी टीव्ही, रेडिओ आणि डिजिटल माध्यमांशिवाय बातम्या, सिनेमा, फॅन पार्क आणि विविध मीडियाच्या भागिदारांची घोषणा आयसीसीने केली आहे. पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप 2019चे जागतिक प्रसारण स्टार स्पोर्ट्सशिवाय 20 अन्य भागिदारांसोबत केले आहे. यानुसार 200 हून अधिक देशांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेचे प्रसारण करण्यात येणार आहे. यंदा वर्ल्ड कप स्पर्धेचे भारतातील सात प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. भारतात स्टार स्पोर्ट्स इंग्रजीशिवाय हिंदी, तमीळ, तेलुगु, कन्नड, बांगला आणि मराठी या भाषांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रसारण करणार आहे. यामध्ये 12 सामन्यांचे एशियानेट प्लसच्या माध्यमातून मल्याळी भाषेतसुद्धा प्रसारण केले जाणार आहे. यासाठी स्टार स्पोर्ट्सने जगभरातील प्रसिद्ध समालोचकांची टीम तयार केली आहे. यामध्ये जवळपास 50 समालोचकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच अफगाणिस्तानमध्ये क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे प्रसारण होणार आहे. अफगाणिस्तानमधील सरकारी रेडिओ, टीव्ही याचे प्रसारण करणार आहे.