पनवेल : रामप्रहर वृत्त
ध्येय निश्चित असेल तर कोणताही अडथळा आपला मार्ग रोखू शकत नाही. केवळ ध्येय समोर ठेवून चालणार नाही, तर त्यासोबत तेवढ्याच कठोर परिश्रमाची व जिद्दीची जोड द्यावी लागते तेव्हा कुठे आपणास यश प्राप्त होते, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी शुक्रवारी (दि.9) येथे केले.
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मॅनेजिंग कौन्सिलचे ज्येष्ठ सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विकास देशमुख बोलत होते.
या समारंभास संस्थेचे रायगड विभागीय निरीक्षक रोहिदास ठाकूर, अधिकारी शहाजी फडतरे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डी.बी. पाटील आदी उपस्थित होेते.
स्वतःमध्ये धमक असेल तर आपली कौटुंबिक परिस्थिती कितीही बिकट असली तरी आपण त्यावर मात करू शकतो, असे सांगत विकास देशमुख यांनी स्वतःच्या जीवनातील काही प्रसंग या वेळी कथन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कष्ट करा. कष्टाची लाज बाळगू नका. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी अपार मेहनतीची गरज आहे तसेच विद्यार्थ्यांनी दुसर्याने मिळविलेल्या यशासाठी त्यानांही शाबासकी देणे आवश्यक आहे. आपल्यासोबत इतरांनाही प्रेरित करणे गरजेचे आहे.
प्रारंभी प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की, महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पदके मिळवित आहेत याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
उपप्राचार्य व पारितोषिक वितरण सोहळ्याच्या कार्याध्यक्ष सिद्धवतम मॅडम यांनी महाविद्यालयाचा सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
समारंभास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.ए. पाटील व एन.बी. पवार तसेच माजी उपप्राचार्य डॉ.एन.आर. मढवी, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अनंत जाधव, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रफुल्ल वशेणीकर, प्रा.प्रवीण गायकर व प्रा. शरयू नाईक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विद्याथी परिषदेची अध्यक्ष हर्षदा मोकल हिने मानले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …